निश्चितपणे निवडणुकीत घोटाळे झाले, पण…; प्रशांत किशोर यांनी केले स्पष्ट

बिहारमधील विधानसभा निवडणुकीत भाजप-जदयू आघाडीला राक्षसी बहुमत मिळाले आहे. या निवडणुकीत निश्चितपणे घोटाळे झाले आहेत, हे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. मात्र, याबाबत आपल्याकडे ठोस पुरावे नाहीत, असे राजकीय रणनीतीकार आणि जन सूरजचे संस्थापक प्रशांत किशोर यांनी स्पष्ट केले आहे. निवडणुकीत झालेल्या घोटाळ्यांमुळेच आपल्या पक्षाचा पराभव झाला, असे ते म्हणाले.

बिहार निवडणुकीत जन सूरजच्या पराभवाबद्दल प्रशांत किशोर म्हणाले की, निकाल सध्याच्या वास्तवाशी जुळत नाहीत आणि निवडणुकीत घोटाळे झाल्याचे दिसून येत आहे. मात्र, आपल्याकडे ठओस पुरवे नाहीत. एनडीएकडून महिलांना १०,००० रुपये वाटणे आणि जंगल राजची भीती याचा प्रभाव निवडणुकीत दिसल्याचे त्यांनी सांगितले. आपल्या पक्षाचा पराभव झाला असला तरी ही तर फक्त सुरुवात आहे, अजून बराच प्रवास शिल्लक असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रशांत किशोर यांनी बिहार विधानसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाच्या दारुण पराभवानंतर पहिल्यांदाच भाष्य केले आहे. निवडणुकीत अनेक घओटाळे झाले आहेत. तसेच मतदारयाद्यांमध्ये फेरफार करण्यात आली आहे. मात्र, सध्या आपल्याकडे कोणतेही ठोस पुरावे नाहीत. सध्याचे वास्तव त्यांच्या पक्षाला असलेला जनाधार निकालाशी जुळत नाही. जन सूरजच्या महिनाभर चाललेल्या प्रचारादरम्यान मिळालेला जनतेचा उत्साह, पाठिंबा आणि अभिप्राय प्रचंड सकारात्मक होता, परंतु मतदान निकालांमध्ये ते दिसून आले नाही. त्यामुळे निवडणुकीत घोटाळे झाल्याचे स्पष्ट आहे, असे ते म्हणाले.

निवडणूक निकालांना कोणताही तार्किक आधार नसल्याचे दिसून आले. निवडणुकीत काही अदृश्य शक्ती काम करत होत्या. ज्या पक्षांना लोक ओळखतही नव्हते त्यांना लाखो मते मिळाली. काही लोक मला सांगत आहेत की ईव्हीएममध्ये छेडछाड झाली, परंतु माझ्याकडे त्याचा कोणताही पुरावा नाही. तरीही, अनेक गोष्टी जुळत नाहीत. पहिल्या दृष्टीक्षेपात, काहीतरी चूक झाली असे दिसते, परंतु अद्याप काय ते माहित नाही. निकाल आणि वास्तव जुळत नसल्याने घोटाळा झाल्याचा संशय आणखी वाढतो, असे त्यांनी सांगितले.

प्रशांत किशोर यांनी आणखी एक गंभीर आरोप केला, त्यांनी म्हटले की एनडीएने हजारो महिलांना १०,००० रुपये रोख वाटले आणि हे निवडणुकीच्या घोषणेपासून मतदानाच्या दिवसापर्यंत चालू राहिले. त्यांच्या मते, ही रक्कम फक्त “पहिला हप्ता” होती. महिलांना एकूण २ लाख रुपये मिळतील असे सांगण्यात आले होते. १०,००० रुपये आगाऊ देण्यात आले होते आणि त्यांना सांगण्यात आले होते की जर त्यांनी एनडीएला नितीश कुमार यांना मतदान केले तर उर्वरित रक्कम त्यांना नंतर मिळेल. मी कधीही बिहारमध्येच नव्हे तर देशात कोणत्याही सरकारने महिलांना असे पैसे वाटताना पाहिले नाही. निवडणूक निकालावर परिणाम करणारा हा एक महत्त्वाचा घटक होता.