जमीन खरवडून गेली, आता पाण्यावरची शेती! धाराशिवच्या पालकमंत्र्याचा ‘प्रताप’

भूम, परंडा तालुक्यात मोठ्या प्रमाणात जमिनी पुरामुळे खरवडून गेल्या आहेत. त्या जमिनीसाठी आत्ताच गाळ उपलब्ध होऊ शकत नाही, तेव्हा अशा खरवडून गेलेल्या जमिनीत पाण्यावरची शेती करुन ‘धाराशिव पॅटर्न’ तयार करू असा अजब कयास पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला.

जिल्ह्यातील भूम, परंडा तालुक्यात आलेल्या पुरामुळे शेकडो हेक्टर जमिन खरवडून गेली आहे. शेतातील माती पुरात वाहून गेल्याने त्या ठिकाणी आता केवळ दगड, गोटे शिल्लक राहिले आहेत. शेतकरी आता ही शेती पिकणार कशी अशा चिंतेत असताना पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या या अजब कयासाने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

पालकमंत्री प्रताप सरनाईक हे पूर मदत आढावा बैठकीसाठी धाराशिव येथे आले होते. बैठकीनंतर प्रसारमाध्यमाशी बोलताना ते म्हणाले की, खरवडून गेलेल्या जमिनीला प्राधान्य देण्याची सूचना जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे. मात्र, धरणातील गाळ तात्काळ उपलब्ध होणार नाही. एप्रिल मे महिन्यात धरणातील पाणी कमी झाल्यावर हा गाळ उपलब्ध होऊ शकेल. तोवर शेतकऱ्यांना वर्षभर पीक घेता येणार नाही. त्यामुळे जमीन खरवडून गेली…अशा जमिनीवर पाण्यावरची शेती करता येईल का ? हे पाहण्याच्या सूचना कृषी अधिकाऱ्यांना दिल्या असून त्यांना यासाठी एक महिन्याचा वेळ दिला असल्याचेही त्यांनी सांगितले. पाण्यावरच्या शेतीचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन असून त्यासाठी कोणतीही माती लागत नाही, अशा पाण्यावरच्या शेतीचा ‘धाराशिव पॅटर्न’ निर्माण करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार असून त्यासाठी तरतूद केली असल्याचेही पालकमंत्री म्हणाले.

वास्तविक पाण्यावरच्या शेतीचे तंत्रज्ञान जरी निघाले असले तरी अशी शेती ही खूप खर्चिक आहे. तसेच या तंत्रज्ञानाद्वारे पालेभाज्या, फळभाज्याचे उत्पादन घेता येणे शक्य आहे. मात्र, भूम, परंड्यातील ज्या भागातील शेती खरवडून गेली आहे, त्या भागात कांदा, सोयाबीन, रब्बी हंगामातील विविध पिके घेतली जातात. अशा पिकासाठी ही पाण्यावरची शेती परवडणारी नाही, पालकमंत्र्याना याचे भान असणे गरजेचे आहे.