मुखेडच्या कोविड केअर सेंटरमध्ये होते अनोखी प्रार्थना; रुग्णांना मिळतो आत्मविश्वास

869

नांदेड जिल्ह्यातील मुखेड व परिसरात मोठ्या प्रमाणात कोरोना संसर्गाचे प्रमाण वाढत आहे. मात्र, मुखेडच्या कोविड केअर सेंटरमध्ये होणाऱ्या एका प्रार्थनेमुळे रुग्णांना वेगळी अनुभुती आणि कोरोनावर मात करण्याचा मिळणार आत्मविश्वास मिळतो. या सेंटरमध्ये समुपेदशन करणारे शौकतअली मदार बेग आणि याच सेंटरमध्ये उपचार घेत असलेली आणि आता आजारावर मात केलेल्या संजीवनी कोशिनाथ बोडके या आठवीतल्या विद्यार्थिनीच्या प्रार्थनेने रुग्णांना कोरोनावर मात करण्याचा आत्मविश्वास मिळतो. ”हिच आमची प्रार्थना, अन हेच आमचे मागणे, माणसाने माणसाशी माणसासम वागणे,” ही प्रार्थना सर्वच रुग्णांना वेगळी अनुभूती देते.

नांदेड आणि लातूर जिल्ह्यांच्या काठावर असलेल्या मुखेड तालुक्यात 100 बेडचे कोविड केअर सेंटर आहे. सकाळी उठल्यावर रुग्णांना उत्सुकता असते ती सुमपदेशनाची. मुखेड उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. आनंद पाटील, डॉ. संतोष टांकसाळे, त्यांची टिम आणि या सेंटरचे समुपदेशक शौकत अली मदार बेग सकाळी 9 वाजता येतात. सुरुवातीला एक तास योगा आणि दीर्घ श्वासाच्या काही क्रिया घेण्यात येतात. रुग्णांच्या मनातील शंका दूर करत हा तास पूर्ण होतो. त्यानंतर या रुग्णांमध्येच उपचार घेणारी आठवीत शिकणारी संजीवनी काशिनाथ बोडके प्रार्थनेला सुरुवात करते. नकळत सगळ्यांचे हात जोडले जातात, डोळे मिटतात आणि एका सूरात सगळे म्हणतात, ‘हीच आमची प्रार्थना, अन् हेच आमचे मागणे, माणसाने माणसाशी माणसासम वागणे..!’

प्रार्थना संपल्यावर समुपदेशात प्रश्न-उत्तराचा तास सुरू होतो. अनेक रुग्ण साधेसाधे प्रश्न बेग यांना विचारतात. या सर्व प्रश्नांचे निरसन बेग करतात. गेल्या चार महिन्यांपासून बेग दररोज या कोविड बाधितांच्या वार्डात जाऊन समुपदेशनाचे काम करीत आहेत. हात सतत सॅनिटाइज करणे, सोशल डिस्टन्सिंग आणि मास्क लावणे ही काळजी घेत असल्याचे त्यांनी सांगितले. रुग्णांच्या शंकांचे समाधान करण्याने आपल्याला ऊर्जा मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. सकारात्मक विचार ठेवले की सर्व काम सोपे होते. तसेच समुपदेशनानंतर होणारी संजीवनीची प्रार्थना रुग्णांमध्ये आत्मविश्वास निर्माण करते. उपचारानंतर संजीवनी रुग्णालयातून बाहेर पडली असली, तरी तिच्या प्रार्थनेचे सूर या सेंटरचे वेगळे वैशिष्ट्ये ठरले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या