मुंबई, ठाणे, कल्याणमध्ये कोसळल्या मान्सूनपूर्व सरी; 7 जून आधीच मान्सूनचे आगमन होण्याची शक्यता

चातकाप्रमाणे मान्सूनची वाट पाहणाऱया मुंबईसह उपनगरवासीयांसाठी आणि दुष्काळामुळे चिंताग्रस्त झालेल्या बळीराजासाठी आनंदाची बातमी आहे. 7 जून आधीच मान्सूनचे आगमन होण्याची शक्यता आहे. आज दुपारी मुंबई, ठाणे, कल्याण, नवी मुंबई, कर्जतसह राज्यभरात मान्सूनपूर्व सरी कोसळल्या. आभाळ भरून आल्याने उन्हाचा तडाखा काही प्रमाणात कमी झाला. अलिबागमध्ये मुसळधार पाऊस बरसला. त्यामुळे वातावरण गारेगार झाले. दरम्यान, राज्यभरात पुढचे तीन दिवस हवामान विभागाने पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

सिंधुदुर्ग जिह्यात मूसळधार पाऊस झाला. त्यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. कुडाळ, सावंतवाडी, तालुक्यात अनेक ठिकाणी मुसळधर पावसाने हजेरी लावली. सिंधुदुर्ग जिह्यात पुढचे दोन दिवस पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. येत्या तीन ते चार दिवसात मान्सून कोकणात दाखल होईल आणि त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र व्यापेल असा अंदाज आहे. दोन दिवसांपूर्वी मान्सून केरळमध्येच रेंगाळला होता.

आर्द्रतेमुळे उकाडा वाढला

मुंबईसह उपनगरात आर्द्रतेचे प्रमाणही अधिक असल्याने अंगातून अक्षरशः घामाच्या धारा वाहत होत्या. आर्द्रता वाढण्यासोबतकच दमट आणि उष्ण वातावरण तयार झाले आहे. मात्र पुढच्या तीन दिवसात मान्सून गोवा, दक्षिण कोकण असा प्रवास करत दक्षिण- मध्य महाराष्ट्रात दाखल होईल. तर 15 जूनपर्यंत गुजरात, मध्य प्रदेश अशी वाटचाल करेल आणि जूनअखेरीस संपूर्ण देशभरात सक्रिय होईल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.