
जनगणना 2027 अंतर्गत तयारीच्या दृष्टीने जनगणना घर यादी आणि घरगणना मोहिमेची पूर्वचाचणी मुंबईसह कोल्हापूर आणि जळगावमध्ये होणार आहे. पालिकेच्या एम/पश्चिम चेंबूर विभागात याची पूर्वचाचणी होईल. 10 ते 30 नोव्हेंबर या कालावधीत ही मोहीम सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये राबवली जाणार आहे.
जनगणना पूर्वचाचणीच्या पार्श्वभूमीवर पालिका आयुक्त प्रशासक भूषण गगराणी यांची जनगणना संचालनालयाच्या संचालक डॉ. निरुपमा जे. डांगे यांनी आज भेट घेतली. यावेळी झालेल्या चर्चेनुसार महाराष्ट्र राज्यातील घर यादी व घरगणनेची पूर्वचाचणी निवडक तीन नमुना क्षेत्रांमध्ये केली जाणार आहे. पूर्वचाचणीकरिता निवडलेल्या नमुना क्षेत्रांमध्ये पालिकेच्या एम/पश्चिम प्रभागातील 135 घर यादी गट, जळगाव जिह्यातील चोपडा तहसील येथील 26 गावे आणि कोल्हापूर जिह्यातील गगनबावडा तहसील येथील 45 गावे यांचा समावेश आहे. या क्षेत्रांमध्ये होणाऱ्या जनगणना पूर्वचाचणीसाठी जनगणना अधिनियम, 1948 च्या तरतुदी लागू राहतील. पूर्वचाचणीच्या अनुषंगाने राज्यात 402 प्रगणक आणि पर्यवेक्षकांचा चमू कार्यरत असणार आहे.
अशी होणार जनगणना
केंद्र शासनाने 2027 मध्ये जनगणना घेण्याचा निर्णय आधीच जाहीर केला आहे. जनगणनेचा पहिला टप्पा म्हणजे घर यादी व घरगणना (टप्पा-1) हा एप्रिल ते सप्टेंबर 2026 या दरम्यान एका महिन्याच्या कालावधीत पार पडेल. लोकसंख्या गणना (टप्पा-2) फेब्रुवारी 2027 मध्ये पार पडेल. या उपक्रमासाठी मुंबईकरांनी सहकार्य करावे, असे आवाहन पालिका प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात आले आहे.

























































