बाँके बिहारी मंदिराच्या तळघरात आढळला मौल्यवान खजिना

तब्बल पाच दशकांनंतर उघडण्यात आलेल्या मथुरेतील बाँके बिहारी मंदिराच्या तळघरात कुबेराचा खजिना आढळला आहे. या खजिन्यात सोने, चांदीच्या विटा, रत्नांचे खडे आणि मौल्यवान नाण्यांचा समावेश आहे. बाँके बिहारी मंदिराचे तळघर 1971 पासून बंद होते. सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या समितीने मागील महिन्यात ते खुले करण्याचे आदेश दिले होते. धनत्रयोदशीच्या मुहुर्तावर शनिवारी या आदेशाची अंमलबजावणी करण्यात आली. मंदिराचे पुजारी, समितीचे सदस्य व सरकारी अधिकारी यावेळी उपस्थित होते.

त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, तळघरातील एका लांबलचक पेटीत गुलालाने माखलेली एक सोन्याची वीट आणि तीन चांदीच्या विटा मिळाल्या. या सर्व विटा 3 ते 4 फूट लांबीच्या आहेत. त्याचबरोबर लाल आणि हिरव्या रंगाचे काही रत्नांचे खडे, मौल्यवान नाणी आणि वेगवेगळ्या धातूंची भांडीही सापडली. या संपूर्ण घटनेचे व्हिडीओ चित्रीकरण करण्यात आले. वित्त व महसूल अधिकाऱ्यांनी मंदिराच्या तळघरात सापडलेल्या प्रत्येक वस्तूची नोंद केली आहे.