मंजुरीआधीच ‘एक्स्पो’ची तयारी; मुंबई विद्यापीठाच्या कामकाजात राजकीय हस्तक्षेप, कलिना  कॅम्पसमध्ये प्रोकॅमचे साहित्य उतरले

मुंबई विद्यापीठाच्या स्वायत्ततेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. ‘टाटा मुंबई मॅरेथॉन एक्स्पो 2026’ साठी मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमधील सुमारे तीन एकर जागा तात्पुरत्या भाडय़ाने देण्याचा प्रस्ताव व्यवस्थापन परिषदेसमोर मंजुरीसाठी येण्याआधीच संबंधित जागेवर प्रोकॅम इंटरनॅशनल कंपनीचे पूर्वतयारीचे साहित्य आणून ठेवण्यात आले. या प्रकारामुळे विद्यापीठाच्या कामकाजात थेट राजकीय हस्तक्षेप होत असल्याचा संशय बळावला असून सिनेट सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

टाटा मॅरेथॉन एक्स्पोचा प्रस्ताव गुरुवारी व्यवस्थापन परिषद सभेत मंजुरीसाठी येणार होता, मात्र त्याआधीच कलिना कॅम्पसमधील जागेवर प्रोकॅम इंटरनॅशनलकडून साहित्य उतरवण्यात आल्याचे निदर्शनास आले. प्रस्तावाला अद्याप औपचारिक मंजुरी मिळालेली नसताना ही तयारी सुरू कशी झाली, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

विद्यापीठ प्रशासनावर दबाव?

या प्रकरणावर युवासेना सिनेट सदस्य प्रदीप सावंत आणि माजी सिनेट सदस्य राजन कोळंबेकर यांनी तीव्र प्रतिक्रिया देत मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रा. रवींद्र पुलकर्णी यांना निवेदनात्मक ई-मेल पाठवला आहे.

‘प्रस्ताव मंजुरीपूर्वीच काम सुरू होणे म्हणजे कोणीतरी राजकीय पक्ष किंवा प्रभावशाली व्यक्ती विद्यापीठ प्रशासनावर दबाव टाकत असल्याची शक्यता नाकारता येत नाही,’ असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. तसेच विद्यापीठाच्या दैनंदिन कामकाजात राजकीय हस्तक्षेप सातत्याने वाढत असून त्यामुळे विद्यापीठाची स्वायत्तता धोक्यात आल्याची खंतही त्यांनी बोलून दाखवली.