
कोरोना महामारीचे संकट रोखण्यासाठी संपूर्ण हिंदुस्थानात गेल्या वर्षी 22 मार्चला लॉकडाऊन घोषित करण्यात आला. मात्र लॉकडाऊनचा हा निर्णय जाहीर करण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुणालाही विचारले नाही. तसेच केंद्र सरकारच्या कोणत्याही विभागाशी चर्चा केली नसल्याचा खुलासा माहितीच्या अधिकारातून झाला आहे.
एका रात्रीत नोटबंदीचा निर्णय घेऊन पंतप्रधान मोदी यांनी देशातील जनतेला धक्का दिला होता. कुणाशीही सल्लामसलत न करता नोटबंदीचा निर्णय देशातील लोकांवर लादण्यात आला. त्याचप्रमाणे कोरोना लॉकडाऊनचा निर्णय घेताना मोदी यांनी संबंधित मंत्रालयांशी कोणतीही चर्चा केली नाही. तसेच राज्य सरकारांशीदेखील विचारविनिमय केला नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
हिंदुस्थानात लॉकडाऊन जाहीर करताना केंद्र सरकारने कोणती तयारी केली होती, यासंदर्भात बीबीसीने आरोग्य, वित्त, आपत्ती व्यवस्थापन आदी विविध सरकारी विभागांकडे माहितीच्या अधिकारात 240हून अधिक अर्ज दाखल करत माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. लॉकडाऊनशी संबंधित या एकाही अर्जाला योग्य उत्तर देण्यात आले नाही. लॉकडाऊनचा निर्णय अमलात आणण्याची महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱया गृह मंत्रालयाने विचारलेली माहिती ही आर्थिक स्वारस्याशी संबंधित असल्याचे सांगत जबाबदारी झटकली.

























































