
जेव्हा देशावर संकट येते तेव्हा केंद्र आणि राज्यांनी टीम इंडियाप्रमाणे एकत्र येऊन काम केले पाहिजे, असा पुनरुच्चार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत केला. मोदींनी सद्यस्थितीची कोविड काळाशी तुलना केली आणि तयारी भक्कम ठेवण्याची सूचना केली. दरम्यान, देशात लॉकडाऊन लागणार नाही, असे केंद्राकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही बैठक झाली. 15 राज्यांचे मुख्यमंत्री बैठकीला हजर राहिले. बैठकीला मोदी यांच्यासह संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि गृह मंत्री अमित शहा यांचीही उपस्थिती होती. इराण युद्धामुळे निर्माण झालेल्या इंधन टंचाईसंदर्भात पंतप्रधान मोदी आणि सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची व्हर्च्युअल बैठक झाली. त्या वेळी त्यांनी प्रत्येक राज्यांमधील परिस्थिती जाणून घेतली. पंतप्रधान या वेळी म्हणाले की, हिंदुस्थानकडे ‘कोविड-19’सारख्या महामारीचा सामना करण्याचा अनुभव आहे. केंद्र आणि राज्यांनी त्या वेळी टीम इंडिया म्हणून एकत्र काम केले आणि पुरवठा साखळी, व्यापार तसेच दैनंदिन जीवनावर होणारा परिणाम कमी केला होता. त्याचप्रमाणे सहकार्य आणि समन्वय राखून आपल्याला एकत्रपणे काम करावे लागेल. हेच आपले बलस्थान आहे, असे मोदी म्हणाले.
ज्या राज्यांचे नागरिक आखाती देशांमध्ये वास्तव्यास आहेत त्यांनी संपर्कासाठी हेल्पलाईन सुरू करावी. प्रत्येक राज्यांमध्ये तसेच जिह्यांमध्ये नियंत्रण कक्ष स्थापन करावेत, अशा सूचनाही पंतप्रधान मोदी यांनी केल्या. केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील विशेष अतिरिक्त उत्पादन शुल्कात कपात करण्याच्या निर्णयाचे सर्व मुख्यमंत्र्यांनी स्वागत केले. विधानसभा निवडणुका असलेल्या पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तामीळनाडू आणि पुद्दुच्चेरी या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत स्वतंत्रपणे बैठक होणार आहे.
पर्यायी ऊर्जा स्रोतांचा वापर वाढवा
सौर ऊर्जा, जैव इंधन यासारख्या पर्यायी ऊर्जा स्रोतांचा वापर जास्तीत जास्त प्रमाणात वाढवण्याची गरज आहे. याकडे राज्यांनी तत्काळ लक्ष देण्याची सूचना पंतप्रधान मोदी यांनी केली.
केंद्र-राज्यांत सततच्या संवादाची गरज
पंतप्रधान मोदी म्हणाले की, सध्याच्या परिस्थितीमध्ये सतत लक्ष ठेवून रणनीती आखणे आवश्यक आहे. केंद्र आणि राज्यांमध्ये सततच्या संवादाची गरज असून त्वरित निर्णय घेण्यासाठी वेळोवेळी माहितीचे आदानप्रदान होणे आवश्यक आहे. तसे झाल्यास परिस्थितीनुसार त्वरित प्रतिसाद देता येईल, असे मोदी म्हणाले.
अफवा, चुकीची माहिती रोखणे महत्त्वाचे
सर्व मुख्यमंत्र्यांनी आपापल्या राज्यांमध्ये पुरवठा साखळी विस्कळीत होऊ न देण्याची काळजी घ्यायला हवी. साठेबाज आणि नफेखोरांवर कठोर कारवाई करायला हवी. खतांचा साठा आणि वितरणावर सर्वांनी लक्ष ठेवावे. त्याच वेळी अफवा आणि चुकीच्या माहितीला रोखून योग्य माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे, अशा सूचना पंतप्रधान मोदींनी सर्व मुख्यमंत्र्यांना दिल्या.
g आखातातील युद्धामुळे जी स्थिती निर्माण झाली आहे त्यात नागरिकांच्या हितांचे रक्षण करणे, देशाची आर्थिक आणि व्यापारातील स्थिरता, ऊर्जा सुरक्षा, पुरवठा साखळी मजबूत करणे याला सरकारचे सर्वोच्च प्राधान्य असेल. केंद्र आणि राज्यांनी समन्वयातून काम केल्यास देश या संकटावर निश्चितपणे मात करेल, असे मोदी म्हणाले.





























































