
अमेरिकेतील कुख्यात मानवी तस्कर व सेक्स स्कँडल्सचा सूत्रधार जेफ्री एपस्टिनशी संबंधित फाइल्समध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव आले आहे. मोदी यांची एपस्टिनशी भेटही झाली होती. तसेच, त्याच्या सल्ल्यावरून मोदी इस्रायलमध्ये नाचले आणि गायलेही होते, असा दावा काँग्रेसने केला आहे. काँग्रेसने यासंदर्भातील ई-मेल व व्हॉट्सऍप संभाषणाचे स्क्रीनशॉट शेअर केले आहेत.
जेफ्री एपस्टिन याचा 2019 मध्ये न्यूयॉर्कच्या तुरुंगात संशयास्पद मृत्यू झाला. त्यावरून गदारोळ सुरू झाला आणि एपस्टिनशी संबंधित फाइल्स खुल्या करण्याची मागणी होऊ लागली. त्यानुसार अमेरिकेच्या न्याय विभागाने खुल्या केलेल्या फाईल्समध्ये जगातील अनेक दिग्गजांची नावे आहेत. त्या संदर्भातील कागदपत्रे प्रथमच समोर आली असून यातील एका ई-मेलमध्ये मोदींचा उल्लेख केला आहे. ‘मोदी हे माझा सल्ला घेऊन इस्रायलमध्ये जाऊन नाचले आणि गायले होते. डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी त्यांनी हे सगळे केले होते. त्यातून त्यांचेही काम झाले,’ असे एपस्टिनने यात म्हटले आहे.
मोदींच्या 4 ते 6 जुलै 2017 च्या इस्रायल दौऱ्यानंतर तीन दिवसांनी एपस्टिनने हा मेल लिहिला होता, याकडे काँग्रेसने लक्ष वेधले आहे. ‘हे प्रकरण देशाच्या प्रतिष्ठsशी संबंधित आहे. बलात्कारी एपस्टिनशी मोदींचे काय संबंध होते?’ याबाबत मोदींनी खुलासा करण्याची मागणी काँग्रेसने केली आहे.
परराष्ट्र मंत्रालय म्हणाले, बकवास!
हिंदुस्थानी परराष्ट्र मंत्रालयाने एपस्टिन फाइल्समधील दावे फेटाळून लावले आहेत. ‘पंतप्रधान मोदी यांचा 2017 सालचा इस्रायलचा दौरा औपचारिक होता. त्या दौऱ्याचा उल्लेख वगळता त्या तथाकथित फाइल्समधील सगळ्या गोष्टी निराधार आणि निरर्थक आहेत. त्याकडे दुर्लक्ष करणेच उत्तम होईल’, असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवत्ते रणधीर जयस्वाल म्हणाले.
रशियन महिलांशी संबंधांमुळे बिल गेट्स यांना गुप्तरोग
एपस्टिन फाइल्समध्ये अब्जाधीश उद्योजक एलॉन मस्क, बिल गेट्स, डोनाल्ड ट्रम्प यांची मुलगी इवांका हिच्यासह हिंदुस्थानी दिग्दर्शक मीरा नायर यांचेही नाव असल्याचे समोर आले आहे. मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स यांचे रशियन महिलांशी संबंध होते. त्यातून त्यांना गुप्तरोगही झाला होता, असा दावा एपस्टिन फाइल्समध्ये करण्यात आला आहे. दरम्यान, बिल गेट्स यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. ‘एपस्टिनचे दावे निराधार आणि खोटे आहेत. यातून एपस्टिनचे नैराश्य दिसते. गेट्स यांच्याशी असलेल्या संबंधांत दुरावा आल्याच्या रागातून बदनामी करण्याच्या हेतूने त्याने हे लिहून ठेवले आहे,’ असे गेट्स यांच्या प्रवक्त्याने सांगितले.
काँग्रेसचे सरकारला प्रश्न
नरेंद्र मोदी हे एपस्टिनकडून कोणते सल्ले घेत होते?
इस्रायलमध्ये नाचगाणे करून मोदींनी ट्रम्प यांना कोणता फायदा मिळवून दिला?
‘त्यांचे काम झाले’ याचा अर्थ काय?
एपस्टिनने स्टीव्ह बॅननला पाठवलेला मेसेज
‘मोदींसोबत माझी एक खूप चांगली बैठक झाली. मोदी मला म्हणाले, वॉशिंग्टनमध्ये मला कोणी विचारत नाही. आमचा मुख्य शत्रू चीन आहे आणि पाकिस्तान त्याचे प्यादे आहे. मोदी तुमच्या धोरणाशी पूर्ण सहमत आहेत. तुम्ही त्यांना भेट दिली पाहिजे. मी तशी व्यवस्था करतो,’ असा मेसेज एपस्टिनने ट्रम्प यांचे माजी सल्लागार स्टीव्ह बॅनन यांना पाठवला होता. त्याचाही स्क्रीनशॉट काँग्रेसने शेअर केला आहे. ‘मोदी आणि बॅनन यांच्यातील बैठकीत काय झाले,’ अशी विचारणाही काँग्रेसने केली आहे.
























































