सय्यद मुश्ताक अली चषक क्रिकेट – मुंबईकर पृथ्वी शॉचे दमदार पुनरागमन

1573

बीसीसीआयने घातलेली आठ महिन्यांची बंदी संपवून देशांतर्गत क्रिकेटमध्ये परतलेला मुंबईचा धडाकेबाज युवा सलामीवीर पृथ्वी शॉ याने सय्यद मुश्ताक अली चषक क्रिकेट स्पर्धेत दमदार पुनरागमन केले आहे. आसामविरुद्धच्या लढतीत मुंबईचे प्रतिनिधित्व करताना पृथ्वीने 39 चेंडूंत 63 धावांची धडाकेबाज खेळी केली. त्याने 32 चेंडूंतच आपले अर्धशतक पूर्ण केले. शिवाय आदित्य तरेच्या साथीने 138 धावांची सवाशतकी सलामी नोंदवली. यष्टिरक्षक तरे (48 चेंडूंत 82 धावा) आणि सिद्धेश लाड (14 चेंडूंत 32 धावा) यांच्या तुफानी खेळाच्या बळावर यजमान मुंबईने पाहुण्या आसाम संघावर 84 धावांनी शानदार विजय मिळवला.

मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या सय्यद मुश्ताक अली चषक क्रिकेट स्पर्धेतील लढतीत यजमान मुंबईनेच रविवारी वर्चस्व गाजवले. अजाणतेपणे सर्दीच्या औषधातून प्रतिबंधित द्रव्य घेतल्याने आठ महिन्यांची बंदी आलेल्या 20 वर्षीय पृथ्वीने आपले मैदानातील पुनरागमन सार्थ ठरवले. त्याने धडाकेबाज अर्धशतकी खेळीने मुंबईच्या विजयाला मोठा हातभार लावला. त्यानंतर मध्यमगती गोलंदाज शिवम दुबेने 3 धावांत 2 धवल कुलकर्णी (28 धावांत 2) तर शम्स मुलानी (15 धावांत 2) यांनी आसामचा डाव 8 बाद 123 धावांवरच रोखण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

सिद्धेश लाडचा धडाका

मुंबईचा कर्णधार सूर्यकुमार यादव (0) आणि आदित्य तरे (82) लागोपाठ बाद झाल्यावर सिद्धेश लाडने आपल्या बॅटचे पाणी आसामकरांना दाखवले. त्याने 14 चेंडूंत 32 धावांची भन्नाट खेळी केल्यानेच मुंबईला निर्धारित 20 षटकांत 200 धावांचा टप्पा पार करता आला. या विजयानंतर मुंबईने ‘ड’ गटातून 7 लढतींत 24 गुण मिळवून स्पर्धेच्या सुपर लीगमध्ये धडक मारण्याच्या दिशेने पाऊल उचलले आहे.

मुंबई : 20 षटकांत 5 बाद 206

आसाम : 20 षटकांत 8 बाद 123

पुनरागमनानंतर माझे लक्ष्य फक्त अधिकाधिक धावा करणे हेच असेल. टीम इंडियात माझी निवड करावी की नाही याचा निर्णय निवड समितीच घेईल. –  पृथ्वी शॉ

आपली प्रतिक्रिया द्या