
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
‘आयपीएल’मध्ये दिल्ली कॅपिटलकडून खेळणाऱया पृथ्वी शॉची क्रिकेटविश्वात सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. मुंबईच्या या तुफानी फलंदाजामध्ये वीरेंद्र सेहवागची झलक दिसते, अशी पावती वेस्ट इंडीजचा महान क्रिकेटपटू ब्रायन लाराने दिली.
लारा म्हणाला, पृथ्वी शॉची फलंदाजी शैली सेहवागसारखीच दिसते. छोटय़ा चणीचा पृथ्वी शॉ सेहवागप्रमाणेच कट मारतो. त्याच्या शॉर्ट आर्म पूलमध्येही सेहवागच्याच फटक्याची हुबेहूब छबी दिसते. पृथ्वीच्या फलंदाजीतील परिपक्वता म्हणजे कमालच होय. गतवर्षी राजकोटमधील पदार्पणाच्या कसोटीत पृथ्वीने ठोकलेले शतक बघून मी प्रभावित झालो. मागील ऑक्टोबरमध्ये वेस्ट इंडीजविरुद्धही त्याने धावांची लयलूट केली होती. एखाद्या युवा खेळाडूला जबरदस्त फलंदाजी करताना बघून मनाला समाधान वाटते. खरे तर पृथ्वीला ऑस्ट्रेलिया दौऱयावर खेळताना बघायचे होते, मात्र दुर्दैवाने त्यावेळी दुखापतीमुळे त्याला एकही सामना न खेळताच मायदेशी परतावे लागले.
पृथ्वी शॉची ही दुसरी ‘आयपीएल’ स्पर्धा होय. त्यामुळे वयाने जरी तो (19 वर्षीय) लहान असला तरी आता त्याला वरिष्ठ खेळाडू मानायला हरकत नाही. चाहत्यांना त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. पृथ्वीने सहा सामन्यांत 152.25च्या स्ट्राइक रेटने 169 धावा फटकावल्या आहेत. हा लंबी रेसचा क्रिकेटपटू वाटतो.
ब्रायन लारा



























































