पृथ्वी शॉचे `टीम इंडिया’त पुनरागमन होणार?

550

डोपिंगमध्ये दोषी सापडल्याने आठ महिन्यांच्या बंदीनंतर पृथ्वी शॉने क्रिकेटच्या मैदानावर दमदार पुनरागमन केले. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीनंतर आता रणजी ट्रॉफीतही पृथ्वीची बॅट तळपली. बडोद्याविरुद्ध मोसमातील पहिल्याच डावात त्याने 66 धावांची खेळी केली. त्यामुळे पृथ्वी शॉची न्यूझीलंड दौऱ्यासाठी ‘टीम इंडिया’त निवड होण्याची शक्यता बळावली आहे.

न्यूझीलंड दौऱ्यावर कसोटी मालिकेसाठी तिसरा सलामीवीर म्हणून पृथ्वी शॉची निवड होण्याची दाट शक्यता आहे. न्यूझीलंड दौऱ्यापूर्वी पृथ्वी शॉ इंडिया ‘ए’कडून न्यूझीलंड ‘ए’विरुद्ध दोन चारदिवसीय सामने खेळणार आहे. या संघात चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे व मयांक अग्रवालही खेळणार आहेत. न्यूझीलंड दौऱ्यावर जाण्यापूर्वी ‘बीसीसीआय’ची संघनिवड समिती सलामीवीरांना कमीत कमी दोन सराव सामने खेळविण्याचा विचार करीत आहे. पृथ्वी शॉचे कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन झाले तर लोकेश राहुलला संघाबाहेर बसावे लागले. कारण खराब कामगिरीमुळे त्याला कसोटी संघातून वगळून रोहित शर्माला संधी देण्यात आली होती. त्यामुळे न्यूझीलंड दौऱ्यावर रोहित व मयांक अग्रवाल ‘टीम इंडिया’च्या डावाची सुरुवात करतील हे जवळपास पक्के आहे. आता तिसरा सलामीवीर म्हणून पृथ्वी शॉचे नाव पुढे आले आहे. मात्र, ‘टीम इंडिया’त स्थान मिळविण्यासाठी या मुंबईकर फलंदाजाला रणजी ट्रॉफीमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करावी लागणार आहे. लोकेश राहुलने रणजी ट्रॉफीत लक्षवेधी कामगिरी केली तर त्याच्याही नावाचा न्यूझीलंड दौऱ्यासाठी विचार होऊ शकतो.

हिंदुस्थानचा क्रिकेट संघ जानेवारीमध्ये न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार आहे. हा खडतर दौरा 24 जानेवारीपासून पाच टी-20 सामन्यांच्या मालिकेने सुरू होईल. त्यानंतर 5 फेब्रुवारीपासून तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जाईल. मग 21 फेब्रुवारीपासून दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेला प्रारंभ होणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या