सिंदखेड राजा नजीक खाजगी बसचा अपघात; 18 प्रवासी जखमी, लहान बाळाची प्रकृती चिंताजनक

चालकाला डुलकी लागल्याने पुणे ते यवतमाळ या खाजगी ट्रॅव्हल्सच्या बसला सिंदखेड राजा नजीक अपघात झालाय. शुक्रवारी 7 जून रोजी सकाळी सहाच्या सुमारास ही घटना घडली असून यात 18 प्रवासी जखमी झालेत तर लहान बाळाची प्रकृती चिंताजनक आहे. अपघातातील पाच ते सहा जखमींना सिंदखेड राजा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले तर 10 ते 12 जखमींना जालन्यातील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत.

जखमींमध्ये लहान बालकांना मोठ्या प्रमाणावर गंभीर दुखापत झाली. दरम्यान चिंतामणी ट्रॅव्हल्सच्या चालकाला गाडी चालवताना डुलकी आली त्यामुळे गाडीवरील नियंत्रण सुटून अपघात घडल्याची माहिती आहे. चालकाला डुलकी आल्याने गाडीवरील ताबा सुटला आणि सादर ट्रॅव्हल्सने दोन ते तीन पलटी खाल्ली आणि त्यामध्ये प्रवाशांना गंभीर दुखापत झाली असल्याचं अपघातातील जखमींना म्हटलंय. दरम्यान जालन्यातील शासकीय रुग्णालयात उपचार सुरु असलेल्यांपैकी चार जखमींना छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात पाठवण्यात आल्याची माहीती अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र गाडेकर यांनी दिली आहे.