
मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद अशी धावणारी देशातील दुसरी प्रायव्हेट ट्रेन ‘तेजस एक्सप्रेस’ सुरू होण्याआधीच वादात सापडली आहे. या ट्रेनच्या नावाच्या पाटीवर एकीकडे केवळ हिंदी, इंग्रजी आणि गुजराती भाषेला स्थान देण्यात येऊन मराठी भाषेला स्थानच न दिल्याने खळबळ उडाली आहे तर दुसरीकडे या ट्रेनला रेल्वेच्या विविध युनियनतर्फे काळे झेंडे दाखवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन क्र. 82902/82901 अहमदाबाद-मुंबई-अहमदाबाद अशा दुसऱ्या प्रायव्हेट ट्रेन ‘तेजस’चे 17 जानेवारीला उद्घाटन होत आहे. तर प्रवाशांसाठी ती 19 नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. तत्पूर्वी या ट्रेनची चाचणीदेखील करण्यात आली आहे. या ट्रेनच्या नावाच्या पाटीवर केवळ इंग्रजी, हिंदी आणि गुजराती भाषेलाच स्थान देण्यात आले आहे. मुंबई सेंट्रलवरून सुटणाऱ्या या ट्रेनच्या पाटीवर मराठी भाषेला स्थान देण्यात न आल्याने त्रिभाषा सूत्राचा विसर रेल्वेची खानपान सेवा सांभाळणाऱ्या आयआरसीटीसीला झाला असल्याची टीका सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे.
स्थानिक पदार्थ पुरवणारे स्थानिक भाषा विसरले
या ट्रेनने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे लगेज कुरियरने पाठवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तुमच्या घरातून सामान आणून ते तुमच्या प्रवासाच्या ठिकाणी पोहचवण्याची व्यवस्था प्रायोगिक तत्त्वावर करण्यात येणार आहे. त्यासाठी काही पैसे आकारण्यात येणार आहेत. ट्रेनचे आरक्षण 60 दिवस आधी करण्याची सोय आहे. ट्रेनमध्ये अनलिमिटेड चहा आणि ‘आरओ’चे पाणी पुरवण्यात येणार आहे. ट्रेन एक तास लेट झाल्यास 100 रू. तर दोन तासांपेक्षा जादा लेट झाल्यास प्रत्येक प्रवाशाला 250 रू.भरपाई मिळणार आहे. ऑन बोर्ड स्थानिक पदार्थाची मेजवाणी मिळणार असली तरी स्थानिक भाषेला मात्र दुय्यम स्थान दिल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.




























































