प्रियाचा विजय; जडुमणी पराभूत, आशियाई बॉक्सिंग स्पर्धा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आशियाई बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेच्या दुसऱया दिवशी हिंदुस्थानी खेळाडूंनी दमदार कामगिरी करत आपली छाप सोडली. हिंदुस्थानच्या प्रिया हिने एकतर्फी विजय मिळवला, तर जडुमणी सिंगने अव्वल मानांकित प्रतिस्पर्ध्याला दिलेली निकराची झुंज अपयशी ठरली.

महिलांच्या 60 किलो गटात प्रियाने कझाकस्तानच्या रिम्मा वोलोसेन्कोवर 5-0 अशा एकतर्फी विजय मिळवत शानदार कामगिरी केली. संपूर्ण लढतीत तिने नियंत्रण आणि संयम राखत प्रतिस्पर्ध्यावर वर्चस्व गाजवले आणि पुढील फेरीत प्रवेश केला. आता तिचा सामना चीनच्या दुसऱया मानांकित चेंग्यू यांग हिच्याशी होणार असून, ही लढत उच्च दर्जाची ठरण्याची शक्यता आहे.

पुरुषांच्या 55 किलो गटात जडुमणी सिंगने जपानच्या अव्वल मानांकित रुई यामागुचीविरुद्ध अत्यंत चुरशीची लढत दिली. अखेर त्याला 2-3 अशा निर्णयाने पराभव स्वीकारावा लागला. यामागुचीने याआधी अस्ताना स्पर्धेत रौप्य आणि बॉक्सिंग वर्ल्ड कप फायनल्समध्ये कांस्यपदक जिंकले असल्याने तो या स्पर्धेतील प्रमुख दावेदार मानला जात आहे. तरीही जडुमणीने त्याला जोरदार टक्कर देत अखेरच्या क्षणापर्यंत सामना रंगतदार ठेवला. ही लढत दिवसातील सर्वात अटीतटीची ठरली.

एकीकडे प्रिया हिचा दमदार विजय, तर दुसरीकडे जडुमणीची जिद्दी झुंज यामुळे हिंदुस्थानी संघाने स्पर्धेच्या सुरुवातीच्या टप्प्यातच आपली ताकद दाखवून दिली आहे. आशियाई बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत उपखंडातील अव्वल बॉक्सर्स सहभागी झाले असून प्रत्येक सामना पदकांच्या शर्यतीत निर्णायक ठरत आहे.