बिहार निवडणुकीच्या आधी महिलांना १० हजार रुपये देण्यात आले, 20 वर्षात का नाही दिले? प्रियांका गांधींचा PM मोदींना सवाल

नरेंद्र मोदी आणि नितीश कुमार यांनी बिहार निवडणुकीच्या एक आठवडा आधी महिलांना १० हजार रुपये देण्याची घोषणा केली. २० वर्षांपासून हे १० हजार रुपये कुठे होते? असा सवाल काँग्रेस खासदार प्रियांका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बिहारमधील एनडीए सरकारला विचारला आहे. बिहारमधील सोनबरसा येथे निवडणूक सभेत संबोधित करताना त्या असं म्हणाल्या आहेत.

यावेळी बोलताना प्रियांका गांधी म्हणल्या की, “याआधी महिला संघर्ष करत नव्हत्या का? महिलांना २० वर्षे का वाट पहावी लागली? भाजप-जेडीयूचे हेतू स्पष्ट नाहीत. त्यांचा हेतू ओळखा. त्यांच्याकडून १०,००० रुपये घ्या, पण त्यांना मतदान करू नका.”

प्रियांका गांधी पुढे म्हणाल्या की, “भाजप-जेडीयू सरकारने फक्त महिलांची फसवणूक केली आहे. त्यांना त्यांचे संघर्ष कधीच समजले नाहीत आणि आता ते निवडणुकीच्या वेळी पैशाने मते खरेदी करू इच्छितात. पण बिहारने त्यांचे हेतू ओळखले आहेत, ते त्यांच्या मतांनी योग्य उत्तर देईल.”

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करत त्या म्हणाल्या की, “नरेंद्र मोदींनी सर्व मोठे उद्योग त्यांच्या मित्रांना दिले आहेत. गौतम अदानींना बिहारमध्ये एक रुपया प्रति एकर दराने जमीन देण्यात आली होती, पण जर तुम्ही ती जमीन खरेदी करायला गेलात तर तुम्हाला कर्ज घ्यावे लागेल. तसेच तुमचे कर्ज कधीही माफ होणार नाही, परंतु मोदीजींच्या मित्रांचे हजारो कोटी रुपये माफ झाले आहेत.”