लोकसभा अध्यक्षांच्या दालनात गोंधळ, विरोधी आणि सत्ताधारी पक्षांचे खासदार भिडले; प्रियंका गांधींचा संताप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विरोधी पक्षनेते आणि राहुल गांधी यांना लोकसभेत बोलू दिले जात नव्हते. यावरून विरोधी पक्षाच्या खासदारांनी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या कार्यालयात गोंधळ घालत त्यांना प्रश्न विचारला. या प्रकरणी काँग्रेस खासदार प्रियंका गांधी यांनी संताप व्यक्त केला. “जेव्हा जेव्हा सरकारला संसदेत गोंधळ घालायचा असतो, तेव्हा ते निशिकांत दुबे यांना पुढे करते,” असा थेट आरोप त्यांनी केला.

प्रियंका गांधी म्हणाल्या की, सरकार एका सदस्याला प्रकाशित पुस्तकातून संदर्भ देण्याची परवानगी देत नाही. मात्र भाजपचे खासदार निशिकांत दुबे सभागृहात सहा पुस्तके घेऊन येतात आणि त्यातून उद्धरणे देतात. “हे दुटप्पी धोरण आहे. सरकारला संसदेत फक्त आपलीच पद्धत चालावी, असे वाटते,” असे त्यांनी स्पष्ट केले. या प्रकारामुळे लोकसभा अध्यक्षांचा आणि संसद या संस्थेचाच अवमान होत असल्याचे प्रियंका गांधी म्हणाल्या. “विरोधी पक्षनेते (LoP) ही केवळ एक व्यक्ती नसून, ते संपूर्ण विरोधकांचे प्रतिनिधित्व करतात. त्यांना बोलू न देणे म्हणजे संपूर्ण विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न आहे,” असे त्यांनी सांगितले. सरकार जाणीवपूर्वक नेहरूंचा मुद्दा पुढे आणत असल्याचा आरोप करत प्रियंका गांधी म्हणाल्या की, “देशाच्या नेतृत्वाबाबत एका माजी लष्करी अधिकाऱ्याने जे काही म्हटले आहे, त्यावरून लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठीच नेहरूंचा मुद्दा पुन्हा पुन्हा काढला जात आहे.” इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाचा संदर्भ देत प्रियंका गांधी म्हणाल्या, “इंदिरा गांधी यांनी कधीही निर्णय घेण्यापासून माघार घेतली नाही. देश अशा पद्धतीने चालवला जात नाही, जसा आज चालवला जात आहे.”

आज सभागृहात जे घडले, त्याचा उद्देश फक्त एकच असल्याचे त्यांनी सांगितले. “सभागृहात फक्त सरकारला जे हवे आहे, तेच घडावे, आणि विरोधी पक्षनेत्याला बोलू द्यायचे नाही, हेच आज दाखवून दिले गेले,” असा आरोप त्यांनी केला. हा मुद्दा अत्यंत गंभीर असल्याचे सांगत प्रियंका गांधी म्हणाल्या, “हे केवळ राजकारण नाही, तर लोकशाहीच्या कार्यपद्धतीचा प्रश्न आहे. हे समजून घेणे सर्वांसाठी आवश्यक आहे. इतिहासात प्रथमच असे घडत आहे की, सरकारलाच संसद चालवायची नाही,” असा गंभीर आरोप त्यांनी केला.