
मागील वर्षाच्या जून महिन्यापासून मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन विभागाला पूर्णवेळ संचालक लाभलेला नाही. परिणामी गेल्या काही महिन्यांमध्ये विद्यापीठात निकालाचा गोंधळ सुरूच आहे. मुख्य परीक्षेच्या निकालास उशीर, फेरपरीक्षा तोंडावर आली तरी मुख्य परीक्षेच्या पूनर्मूंल्याकनाचा निकालच लागत नाही. त्यामुळे फेरपरीक्षा द्यायची की नाही, असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडतो. परीक्षा… निकाल… परीक्षा… या चक्रव्यूहात सापडलेले विद्यार्थी परीक्षा व मूल्यमापन मंडळाला पूर्णवेळ संचालक कधी मिळणार याच्या प्रतीक्षेत आहेत. 25 सप्टेंबर रोजी या पदांसाठी मुलाखती पार पडल्या, मात्र आज दहा दिवस उलटून गेले तरी नावाची घोषणाच झालेली नाही.
परीक्षा व मूल्यमापन मंडळ यांच्या संचालक पदासाठी मुलाखती पार पडल्या, परंतु नाव जाहीर करण्यात एवढा विलंब का होत आहे, असा सवाल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) युवासेनेने केला आहे. वास्तविक मुलाखती झाल्यानंतर एक-दोन दिवसांत नाव जाहीर केले जाते, परंतु यावेळी दहा दिवसांनंतरही नावाची घोषणा नाही. ही विद्यापीठ प्रशासनाची विद्यार्थ्यांप्रति अनास्था आहे की सरकारकडून उमेदवार येण्याची वाट पाहिली जात आहे, असा सवाल युवासेना माजी सिनेट सदस्य प्रदीप सावंत, राजन कोळंबेकर यांनी केला आहे. युवासेनेच्या वतीने कुलपती, राज्यपाल रमेश बैस यांच्याकडे परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालक पदावर नियुक्तीसाठी पुढाकार घेऊन आदेश देण्याची मागणी करण्यात आली आहे.
पुन्हा नियुक्तीचा खटाटोप तर नाही ना…
परीक्षा विभागाचा आधीच गोंधळी कारभार सुरू आहे. त्यात परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालक नियुक्तीला उशीर करून विद्यापीठ प्रशासन या गोंधळात भर टाकत आहे. विद्यार्थ्यांच्या शुल्कातून यांच्या जाहिरातीचा आणि मुलाखतीचा खर्च करूनही नियुक्तीसाठी एवढा उशीर होत आहे. त्यामुळे शंका उपस्थित होत आहे की, एकही उमेदवार पदाला न्याय देणारा नाही, असा शेरा देऊन पुन्हा सर्व घाट घालण्याचा प्रकार तर होणार नाही ना, अशी शंका माजी सिनेट सदस्य प्रदीप सावंत यांनी उपस्थित केली.

























































