ग्रामपंचायतींना 14 व्या वित्त आयोगाचा निधी मिळण्यात दिरंगाई, विकासकामे रखडली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । अलिबाग

ग्रामपंचायत हद्दीत ग्रामविकास व्हावा यासाठी शासनातर्फे 14 वित्त आयोगाचा निधी ग्रामपंचायतीला दिला जातो. मात्र सहा महिन्यांपासून जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना हा 14 वित्त आयोगाचा निधी प्राप्त झालेला नाही. 14 वित्त आयोगाचा निधी शासनाकडून कधी पर्यत प्राप्त होणार याबाबतही कोणतीही माहिती जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाला नसल्याने जिल्ह्यातील ग्रामपंचायतीची विकास कामे रखडली गेली आहेत.

राज्य शासनाकडून प्रत्येक ग्रामपंचायतीला ग्रामविकास करण्यासाठी व दुर्बल घटकाच्या विकासासाठी 14 वित्त आयोगाचा निधी दिला जातो. 14 वित्त आयोगाच्या निधीतून पेयजल सुविधा, अंतर्गत रस्ते, स्मशान भूमी सुशोभीकरण, स्ट्रीट लाईट, स्वच्छता, तसेच अन्य सुविधांसाठी हा निधी ग्रामपंचायत खर्च करीत असते. शासनामार्फत पाठविलेला हा निधी जिल्हा परिषदेच्या अर्थ विभागाकडून परस्पर ग्रामपंचायतीच्या खात्यात वर्ग केला जातो. या निधीतून ग्रामपंचायत गावातील विकासकामे करीत असतात.

जिल्ह्यात साधारण वर्षाला 30 कोटींचा 14 वित्त आयोगाचा निधी टप्या टप्याने येत असतो. यातील काही निधी जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना सप्टेंबर 2018 मध्ये प्राप्त झाला आहे. मात्र सहा महिने उलटून गेले तरी पुढील निधी ग्रामपंचायतींना अजून प्राप्त झालेला नाही. त्यामुळे ग्रामपंचायतीमधील विकास कामांना अडथळा निर्माण झालेला आहे.

राज्य शासनाकडून अद्यापही 14 वित्त आयोगाच्या निधीचे वाटप केलेले नाही. लोकसभा निवडणूक आचारसंहिता लागण्यापूर्वी हा निधी प्राप्त झाला तर विकासकामांना गती मिळू शकते. मात्र आचारसंहिता लागल्यानंतर निधी प्राप्त होण्यास मात्र अजून काळ लागला जाईल असे ग्रामपंचायत सदस्याचे म्हणणे आहे. त्यामुळे लवकरात लवकर 14 वित्त आयोगाचा निधी प्राप्त व्हावा अशी अपेक्षा ग्रामपंचायत सदस्यांकडून होत आहे.

14 वित्त आयोगाचा सप्टेंबर 2018 रोजी निधी जिल्हा परिषदेकडे आलेला होता. तो ग्रामपंचायतीकडे वर्ग केलेला आहे. पुढील निधी अजून शासनाकडून आलेला नाही. मात्र 10 ते 15 दिवसांत 14 वित्त आयोगाचा निधी प्राप्त होईल. त्यानंतर आलेला निधी जिल्ह्यातील ग्रामपंचायतीकडे वर्ग केला जाईल – शीतल पुंड
उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.प), राजीप