मुंबईत मतदार माहिती चिठ्ठय़ांचे घरोघरी वितरण

15 जानेवारीला होणाऱ्या महापालिकेच्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर मतदारांचे नाव, पत्ता, मतदार यादीतील भाग क्रमांक, मतदान केंद्राचे नाव व खोली क्रमांक यांसह आवश्यक माहिती असलेली मतदार माहिती चिठ्ठी वितरणाची प्रक्रिया शुक्रवारपासून सुरू करण्यात आली आहे. मतदारांची कोणतीही गैरसोय होणार नाही यासाठी मुंबईतील प्रत्येक पात्र मतदारापर्यंत निर्धारित कालावधीत ही चिठ्ठी वेळेत पोहोचावी, असे निर्देश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांनी दिले आहेत. मतदारांनी समन्वय साधून आपली मतदार माहिती चिठ्ठी प्राप्त करून घ्यावी व आपला मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहनदेखील त्यांनी केले. या आदेशांचे काटेकोरपणे पालन करावे. कोणत्याही प्रकारची तक्रार होणार नाही याची दक्षता घ्यावी, असेदेखील निर्देश डॉ. जोशी यांनी दिले आहेत.