
लवकरच जगात सर्वाधिक वेगवान असे 5 जी नेटवर्क सुरू होत आहे. जगातील काही प्रमुख देशात याच्या चाचण्या पूर्ण झाल्या असून, लवकरच; म्हणजे नववर्षाच्या सुरुवातीपासून टप्प्याटप्प्याने त्याचे आगमन अपेक्षित आहे. हिंदुस्थानातदेखील काही प्रमुख शहरांत 5 जी नेटवर्कच्या चाचण्या यशस्वी झाल्या असून आता त्याचे आगमन कधी होते याची प्रतीक्षा आहे. 5 जी नेटवर्क हे अत्यंत वेगवान आणि क्रांती आणणारे असेल असा अनेक तज्ञांचा दावा असला तरी या 5 जी नेटवर्कच्या कथित दुष्परिणामांमुळे जगातील अनेक नागरिक चिंतेत आहेत हेही सत्य आहे.
जगभरातील नामांकित दूरसंचार विशेषतज्ञ, प्रमुख देशांची सरकारे आणि खुद्द जागतिक आरोग्य संघटना या 5 जी नेटवर्कपासून मानवी आरोग्याला काही धोका नाही याची ग्वाही देत असतानादेखील जगातील काही लोकांमध्ये आजही या नेटवर्कचे भय कायम आहे. काही देशांमध्ये या 5 जी नेटवर्कच्या चालू असलेल्या कामांवर आणि ट्रान्समीटरवर हल्ला झाल्याचे समोर आले आहे.
लोकांच्या अशा भीतीचा गैरफायदा न घेतील ते काही व्यापारी कसले? या 5 जी नेटवर्कच्या कथित दुष्परिणामांची भीती अधिक वाढवत या धोक्यांपासून मानवी आरोग्याची सुरक्षा करण्याचा दावा करणारी काही उत्पादने बाजारात आली आहेत. यामध्ये प्रामुख्याने स्लीपिंग मास्क, नेकलेस आणि ब्रेसलेट अशा उत्पादनांचा समावेश आहे. मात्र 5 जी पासून सुरक्षा देण्याचा दावा करणारी ही उत्पादने स्वतः रेडिआऍक्टिव आणि अतिवापराने मानवी आरोग्यासाठी घातक असल्याचा धोका नेदरलॅण्डच्या ’न्यूक्लिअर सेफ्टी आणि रेडिएशन प्रोटेक्शन’ या संस्थेने स्पष्ट केला आहे. अशा दहा उत्पादनांच्या बाबतीत या संस्थेतर्फे लोकांना सावध करण्यात आले आहे.
3 जी आणि 4 जी नेटवर्कच्या सिग्नलप्रमाणेच 5 जी नेटवर्कचे सिग्नल असून ते मानवी आरोग्यासाठी पूर्ण सुरक्षित आहेत. मोबाइल नेटवर्क हे नॉन आयोनायझिंग रेडिओ वेबचा वापर करतात आणि त्यापासून मानवी ‘DNA’ ला कोणता धोका नसल्याचेदेखील संशोधक वारंवार सांगत आहेत.
























































