
सामना प्रतिनिधी । पुणे
लेखक, नाटककार, किवा सर्वसामान्य माणूस म्हणून आपण काहीही करायचे ठरविले तरी या देशातील लोक सुधारणार नाहीत, कारण या देशाची मातीच इतकी मठ्ठ करून ठेवली आहे की त्याला कोणी काही करू शकत नाही. जाती-धर्माच्या नावाखाली देशात दुफळी माजविणारे, हनुमानाचीही जात काढणारे लोक एक दिवस देशाला बुडवतील, अशी भीती अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाचे नियोजित अध्यक्ष प्रा. प्रेमानंद गज्वी यांनी व्यक्त केली.
९९व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेच्या कोथरूड शाखेतर्फे प्रा. प्रेमानंद गज्वी यांचा ज्येष्ठ नाट्यसमीक्षक माधव वझे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. रंगकर्मी अतुल पेठे, अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषद पुणे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, कोथरुड शाखा अध्यक्ष सुनील महाजन, किरण गुजर, शिरीष चिटणीस, दीपाली शेळके आदी उपस्थित होते.
प्रा. प्रेमानंद गज्वी म्हणाले, मी दलित साहित्यिक नाही. मला कशाचेही लेबल लावून घ्यायचे नाही. माझे नाटक जर घटनेच्या विरोधात असेल तर मला जेलमध्ये टाका. मला त्याची फिकीर नाही. संमेलनाचे अध्यक्ष म्हणून मी काहीही करणार नाही. यासाठी नाट्यपरिषद मला मदत करणार आहे का? महापुरुषांच्या बाबतीत मला लिहायचे नाही; कारण आपण आपल्या कर्माने आधीच त्यांची माती करून ठेवली आहे.
नाट्य आणि साहित्य क्षेत्रातील लोक हे सर्वाधिक दांभिक असतात. या संस्था लवकरात लवकर स्वच्छ झाल्या तर एकप्रकारे खऱ्या अर्थाने समाज स्वच्छ होईल, अशी भावना प्रा. प्रेमानंद गज्वी यांनी व्यक्त केली.
माधव वझे म्हणाले, पूर्वी नाटकामध्ये आक्रस्ताळपणाने विषय मांडले जात होते. प्रेमानंद गज्वी यांनी कायम आपल्या कलेतून समाजाला आणि लोकांना प्रश्न विचारले, हे त्यांच्या कलाकृतीचे विशेषण आहे.
अतुल पेठे म्हणाले, अंत:करणाला भिडेल असे लेखन लेखकाने केले पाहिजे. तू लिहिल्यासारखे कर मी वाचल्यासारखे करतो, याला साहित्य चळवळ म्हण्त नाहीत. उद्धव कानडे यांनी सूत्रसंचालन केले. शिरीष चिटणीस यांनी आभार मानले.

































































