इच्छाशक्ती. जिद्द आणि मेहनत करण्याची तयारी असेल तर काहीही अशक्य नाही. याचे आदर्श उदाहरण हॉटेलमध्ये काम करणाऱ्या एका वेटरने शिक्षणाची कास न सोडता पीएच.डी. पदवी मिळवत वरिष्ठ महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्य करताना अनेक विद्यार्थ्यांच्या आयुष्याला आकार देण्याचे काम केले आहे.
पिंपळगाव कह या गावातील प्रा. रमेश रावळकर हे नाव आज सर्वपरिचित झालेले आहे. शिक्षण असो की साहित्य क्षेत्र त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. आज प्राध्यापक असलेल्या रावळकर यांचा जीवनपट पाहिला तर संघर्षमयच राहिलेला आहे. त्यांनी ‘सामना’शी बोलताना जीवनपट उलगडला.
पिंपळगाव कड तसं वारकऱ्यांचं गाव. भल्या पहाटे हरिपाठ, काकड आरती, तर संध्याकाळच्या भजनाचा आवाज हरेक गल्लीत शिरत जातो. याच गावातून मी सात आठ किमीचं आंतर पायी चालत माहोऱ्याच्या जि.प. शाळेतून दहावी पास झालो. शेतात कामाला हाताशी बरा असं म्हणून मामा मला भोकरदनच्या कॉलेजमध्ये अँडमिशन घे असं सांगायचे. धाडला असताना बाबांची वट आणि आता स्वतःच्या वावरात काम करून सुद्धा पिच्छा न सोडणारं दारिद्रय आणि कोरड्याठाक आभाळाकडं टक लावून बघणारे बाबा पाहिल्यावर पोटातली आतडी तटतट तुटायची. आपल्याला हे बदलायचं असेल तर गावात राहून उपयोग नव्हता. मनाला घट्ट करून मी जामनेरला पळून गेलो. जामनेरला मोठी बहीण दिलेली होती. तिचं सासरही होतं. कॉलेजला शिकताना काय खर्च नाही! हा विचार माझ्या मनात सतत यायचा, मग यांना आपला त्रास नको म्हणून मी तिथून पळ काढला आणि छत्रपती संभाजीनगर
शहर गाठलं.
फिरत फिरत विचारत शेवटी एका हॉटेलमध्ये काम मिळालं. अनुभव नसल्यानं त्यांनी सुरुवातीला मोरीत खरकटे भांडे धुवायला बसवलं, सतत पाण्यात हात असल्यानं बोर्ट सडल्यागत व्हायचे. पण, विलाज नव्हता. हॉटेलमध्ये काम करत एका बाजूनं मी शिक्षणही करत होतो. भांडी धूत पुढे किचन हेल्पर, टेबल हेल्पर आणि वेटर असं माझं प्रमोशन होत गेलं. ही सगळी हॉटेलमधली कामं करताना मी कधीच लाज बाळगली नाही हॉटेलमध्ये नोकरी करत करत मी मराठी विषयात एम.ए. केलं. वी.एड. झालं, नेट परीक्षा पास झालो. ज्येष्ठ समीक्षक दादा गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएच.डी.ची संशोधन पदवी मिळवली. खरे तर दादा गोरे व सुनंदा गोरे यांनी मला मायेचा जिव्हाळा दिला. वडिलांचं निधन झाल्यावर या दाम्पत्यानं मला स्वतःच्या मुलासारखं जपलं. यासोबतच्च कवी पी. विठ्ठल व कैलास अंभुरे सदैव माझ्या पाठीशी उभे राहिले. एकदा तर घरात काहीच नव्हतं. किराणा संपल्यानं बायको फक्त आसू गाळत होती. त्या दिवसात मुलीच्या शाळेनंही फीस भरा म्हणून सारखा तगादा लावला होता. माझ्याजवळ तेल, मीठ, मिरची आणायलासुद्धा पैसे नव्हते तर मुलीची शाळेची फीस मी कसा भरणार होतो? माझ्या मनात त्यावेळी आत्महत्येचे विचार घोळू लागले होते आणि तसा मी ठाम निर्णय घेतला.
शेवटी फेसबुकवर एक आत्महत्येची पोस्ट लिहून मी माझ्या तयारीला लागलो. तोच मित्र पी. विठ्ठल याचा फोन आला. बराचवेळ मोबाईल वाजत राहिला. मला काय करावं काहीच सुचत नव्हतं. पण विचार केला की आपण शेवटी मरणार तर आहोतच, तेव्हा शेवटचे एकदा विठ्ठलली बोलायला काय हरकत आहे? गळ्यातली दोरी काढली आणि विठ्ठलचा फोन घेतला. माझा आवाज ऐकताच त्यानं सुटकेचा निःश्वास सोडला आणि भडाभडा बोलत सुटला. बऱ्याच गोष्टी समजावून सांगितल्या. त्यानंतर काही मित्रांनीही आत्महत्या करून प्रश्न मिटणार आहे का? मग मी बराच वेळ विचार करून शांतपणे घरी परतलो. त्यावेळी माझी मुलगी दिगिषा दरवाजात बसून माझी वाट बघत बसली होती.
कादंबरीला मिळाले २१ पुरस्कार
अजिंठा शिक्षण संस्थेच्या रंगनाथ नाना काळे व प्रकाश काळे यांनी आपल्या शिक्षण संस्थेत वरिष्ठ महाविद्यालयात रूजू करून घेतले, आतापर्यंत अनेक विद्याथ्यर्थ्यांच्या आयुष्याला आकार दिला. हिन्दुस्तानच्या कानाकोपऱ्यात वेगवेगळ्या क्षेत्रात माझे विद्यार्थी विविध पदांवर कार्यरत आहेत. हे करत असताना निवडक ग्रंथांचे लेखन केले. यात मातीवेणा, गावकळा, करंडा, मराठवाडा भूषण, टिश्यू पेपर, उपयोजित मराठी आणि भाषिक कौशल्ये, प्रसार माध्यमे आणि भाषिक कौशल्ये आदी पुस्तकांचे लेखन केले. सध्या ‘हिंदू खाटीक’ कादंबरीचे लेखन करतोय. राजहंस प्रकाशनच्या वतीने प्रसिद्ध झालेल्या ‘टिश्यू पेपर’ कादंबरीला एकवीस पुरस्कार मिळाले. पाच विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात ती समाविष्ट झाली. अजूनही प्रश्न संपलेत असे नाही. माझे प्रश्न मला लेखनास प्रवृत्त करतात. मी जसा जगण्यात आहे तसाच शब्दात आहे. विद्यार्थ्यांना शिकवण्यात, वाचण्यात व लेखनात मला जेवढा आनंद मिळतो तेवढा कशातच मिळत नाही. आपल्या विद्याथ्यांनी आपलं नाव उज्ज्वल करून मोठं व्हावं, अशी इच्छा डॉ. रावळकर यांनी व्यक्त केली.