उत्तरपत्रिकेत खाडाखोड करून विद्यार्थ्याला नापास केले, शिक्षकावर कारवाईचे आदेश

सामना ऑनलाईन,पेण

उत्तर पत्रिकेमध्ये खाडाखोड करून विद्यार्थ्याला नापास करणाऱ्या शिक्षकांविरोधात कारवाई करण्याचे मुंबई विद्यापीठाने आदेश दिले आहेत. पेण येथील स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या डॉ. पतंगराव कदम कॉलेजमध्ये हा प्रकार घडला होता. पास असूनही नापास असल्याचा शिक्का बसलेल्या विद्यार्थ्याला 3 वर्ष लढा द्यावा लागला. तन्मय पाटील असं या विद्यार्थ्याचे नाव आहे.

तन्मयने 2014-2015 साली या महाविद्यालयात कला शाखेमध्ये प्रवेश घेतला होता. महाविद्यालयातील असुविधांबाबत आवाज उठवला होता. तन्मयने प्राचार्यांना 29 मागण्यांसंदर्भात एक निवेदन दिले होते. अभ्यासिका खोल्यांचा अभाव,अपुरी आसन व्यवस्था, गळणारे वर्ग व ढासळते छत, दरवाजे व लाईट-फॅनची दूरवस्था अशा मागण्यांचा त्यात समावेश होता. याचा राग आल्याने दुसऱ्या वर्षाच्या दोन पेपरमध्ये तन्मयला नापास केले होते.

तन्मयने उत्तर पत्रिकेच्या छायांकीत प्रति मागविल्या तेव्हा उत्तर पत्रिकेत एकदा दिलेले मार्क  खोडून  पुन्हा कमी करण्यात आल्याचे दिसले. याबाबत त्याने मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थी तक्रार निवारण कक्षाकडे तक्रार केली. गेली तीन वर्ष तो मार्कांसाठी झगडत होता. नुकतेच विद्यापीठाच्या समितीने तन्मय पाटील याच्या उत्तरपत्रिकांचे पुनर्मुल्यांकन करून तो पास असल्याचा निकाल दिला तसेच त्याला नापास करणाऱ्या प्राध्यापकांवर कारवाई करण्याचे आदेश दिले.