विद्यापीठाच्या 73 नव्या कॉलेजांच्या प्रस्तावाला प्राध्यापकांचा विरोध

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पदवी अभ्यासक्रमाच्या जागा मोठ्या प्रमाणावर रिक्त राहत असताना मुंबई विद्यापीठाने यंदा नव्या 73 कॉलेजना विनाअनुदानित तत्त्वावर मंजुरी दिली आहे. मात्र या नव्या कॉलेजांच्या प्रस्तावाला प्राध्यापक संघटनांनी विरोध केला आहे. मुंबईसह ठाणे, रायगड, पालघर जिल्ह्यात पदवी अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱया विद्यार्थ्यांची संख्या रोडावत आहे. जागाही मोठ्या प्रमाणावर रिक्त राहत असताना आणखी नव्या कॉलेजना मान्यता कशासाठी, असा सवाल ‘बुक्टो’ या प्राध्यापकांच्या संघटनेने नुकत्याच झालेल्या सिनेट बैठकीत उपस्थित केला आहे.

मुंबई विद्यापीठाच्या वतीने पाच वर्षांसाठी नव्या कॉलेजांसाठी बृहत् आराखडा तयार केला आहे. या आराखडय़ांतर्गत शैक्षणिक वर्ष 2019-20 ते 2022-23 पर्यंत सायन्स, आर्ट्स, कॉमर्स आणि लॉ अभ्यासक्रमासाठी मुंबई शहरात 5, उपनगरात 12, कोकण क्षेत्रात 56 नवी कॉलेज सुरू करण्याची योजना आहे, मात्र या योजनेला प्राध्यापकांनी विरोध केला आहे. कॉलेज सुरू करण्यास आमचा नकार नाही, पण त्या भागात विद्यार्थीसंख्या उपलब्ध आहे का याचा विचार विद्यापीठाने करावा, असे ‘बुक्टो’ संघटनेचे सिनेट सदस्य रवींद्रनाथ रसाळ यांनी सांगितले. कोणत्याही जिल्ह्यात, तालुक्यात नवे कॉलेज सुरू करण्यास मान्यता देताना विद्यापीठाने तेथील कॉलेजची आवश्यकता, विद्यार्थीसंख्या यांचे सर्वेक्षण करणे आवश्यक आहे. मात्र या नव्या कॉलेजना मंजुरी देताना विद्यापीठाने शहानिशा केलेली नाही, असा आरोप ‘बुक्टो’ने केला आहे.

पदवीच्या विद्यार्थ्यांची घसरलेली पटसंख्या

(2019-20 च्या तुलनेत)

मुंबई शहर      15.2 टक्के

मुंबई उपनगर  12 टक्के

ठाणे             13.9 टक्के

पालघर         5.3 टक्के

रायगड          13.2 टक्के

रत्नागिरी        6.1 टक्के

सिंधुदुर्ग         10.2 टक्के