
मालमत्ता कर विभागाने ऑन फिल्ड उतरून शहरातील सहा बड्या करबुडव्यांच्या मालमत्ता थेट सील केल्या आहेत. महापालिका निवडणुका संपताच कर विभाग अॅक्शन मोडवर आला असून या कारवाईमुळे थकीत मालमत्ता करधारकांचे धाबे दणाणले आहेत. या कारवाईने करदात्यांमध्ये खळबळ उडाली असून यामुळे करवसुलीला गती मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
महानगरपालिका निवडणुकीत मालमत्ता कर विभागातील जवळपास ७५ टक्के कर्मचाऱ्यांची विविध ठिकाणी नियुक्ती करण्यात आली होती. त्यामुळे करवसुलीला गती मंदावली होती. मात्र निवडणूक संपताच प्रशासनाने जोरदार वसुली मोहीम राबवत मालमत्ता जप्तीचा आसूड उगारण्यास सुरुवात केली आहे. मालमत्ताधारकांना अनेक वेळा लेखी नोटीस देऊन कर भरण्याचे आवाहन करण्यात आले होते. मात्र याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने अखेर प्रशासनाने थेट कारवाईचा मार्ग निवडत शहरातील व्यावसायिक तसेच निवासी मालमत्तांवर ही कारवाई करण्यात आली आहे.


























































