नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाची पुनर्रचना, बेलापूर आता नवे परिमंडळ; आयुक्तालयात तीन उपायुक्त

नवी मुंबईतील झपाट्याने वाढणारी लोकसंख्या, नागरीकरण आणि कायदा-सुव्यवस्था या आव्हानांचा विचार करून राज्य सरकारने नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाची पुनर्रचना करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. त्यानुसार विद्यमान परिमंडळ-१ (वाशी) आणि परिमंडळ-२ (पनवेल) यांच्या पुनर्रचनेतून नवे परिमंडळ-२ (बेलापूर) येथे स्थापन करण्यात येणार आहे. यानंतर आयुक्तालयात वाशी, बेलापूर आणि पनवेल अशी ३ पोलीस उपायुक्त परिमंडळे कार्यरत राहतील. याबाबतचा जीआर राज्याच्या गृहविभागाने प्रसिद्ध केला आहे.

नवी मुंबई पोलीस आयुक्तालयांतर्गत परिमंडळ-१ आणि परिमंडळ-२ तसेच पनवेल, पोर्ट, तुर्भे आणि वाशी अशी ४ सहाय्यक पोलीस आयुक्त कार्यालये कार्यरत होती.

सध्या नवी मुंबई आयुक्तालयाचे कार्यक्षेत्र सुमारे ६८८ चौरस कि.मी. पेक्षा जास्त असून लोकसंख्या सुमारे ५८ ते ६० लाखांच्या दरम्यान गेल्याने पोलीस यंत्रणेवरील ताण लक्षणीयरीत्या वाढला आहे. या पार्श्वभूमीवर तिसरे परिमंडळ निर्माण करण्याची आवश्यकता शासनाने मान्य केली. त्यानुसार परिमंडळ-१ वाशी, परिमंडळ-२ बेलापूर (नवे) आणि परिमंडळ ३ पनवेल अशी रचना शासनाने मान्य केली आहे.

उपायुक्त नवीन बेलापूर परिमंडळासाठी पोलीस (१) आणि सहाय्यक पोलीस आयुक्त (२) अशी एकूण ३ नवी पदे निर्माण करण्यास परवानगी दिली आहे.

३८ लाखांची तरतूद 

या पदांसाठी लागणाऱ्या ३८ लाख १८ हजार ५८० रुपये इतक्या खर्चास मंजुरी देण्यात आली आहे. सदर खर्च त्या-त्या वर्षाच्या मंजूर अनुदानातून भागवण्यात येणार आहे. संबंधित परिमंडळ अंतर्गत पोलीस ठाण्यांची विभागणी येत्या काही दिवसांत करण्यात येणार आहे. तसेच नवीन पदांसाठी मनुष्यबळ भरणे, कार्यालयीन पायाभूत सुविधा आणि बजेट वितरण यांची कार्यवाही टप्प्याटप्प्याने केली जाणार आहे. तसेच नागरिकांसाठी संपर्क क्रमांक, कार्यालयीन पत्ता आणि जबाबदारीचे क्षेत्र नंतर जाहीर केले जाणार आहे.