घरं, मंदिरं, मठ आदी धार्मिक वस्तू उद्ध्वस्त न करता कॉरिडॉर शासकीय जागांवर राबवा; कॉरिडॉर विरोधात भव्य मोटरसायकल रॅली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

प्राचीन व पवित्र पंढरीचा विध्वंस नको, काॅरिडॉर करायचा असेल तर तो शासकीय जागांवर करा अशी मागणी करीत आंदोलकांनी शासकीय जागांकडे लक्ष वेधण्यासाठी भव्य रॅली काढली.

पंढरपूर तीर्थक्षेत्र बचाव समितीच्यावतीने कॉरिडॉर विरोधात काढण्यात आलेल्या भव्य मोटरसायकल रँलीच्या माध्यमातून पंढरपूरातील अनेक सरकारी, निमसरकारी जागा वर्षानुवर्षे पडीक पडून आहेत. अनेक ठिकाणी अतिक्रमण झाली आहेत. त्याबाबत शोधयात्रा घेऊन त्या जागा प्रकाशझोतात आणण्यात आल्या आहेत. याकरीता ही मोटर सायकल रॅली काढण्यात आली आहे.

मोटार सायकल रॅलीद्वारे शहरातील पडीक जागांना प्रत्यक्ष भेट देवून पोलखोल करण्यात आली. यामध्ये खादी ग्रामोद्योग, लोटेवाडी म्हसोबा, फटाका स्टॉल, जिजामाता उद्यान, टिळक स्मारक, जूने कोर्ट, हनुमान मैदान, नगरपालिका दवाखाना, जूनी नगरपरिषद इमारत, लोकमान्य हायस्कूल जूनी इमारत, लिमयेवाडा इमारत, सातमजली दर्शन मंडप, इमारत, स्मशानाजवळचा आगामी दर्शन मंडप, आवास, गजानन महाराज पिछाडीचे पार्किंग, गाडगे महाराज चौकातील मोकळ्या जागा, यमाई तलाव व तेथील भलेमोठे पार्किंग, भक्तनिवास, ब्लड बँक जवळील मोकळी जागा, पद्मावती उद्यान, ओपन लाँन आदी जागांची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. या जागांचा अहवाल प्रांत आँफिसला सादर करण्यात आला आहे. अशा प्रकारच्या अनेक जागा वर्षानुवर्षे पडीक, विनावापराच्या आहेत. या शासकीय जागांचा सुयोग्य वापर करून एक सुंदर विकास आराखडा वारकरी संप्रदाय पाईक संघ, पंढरपूर तीर्थक्षेत्र बचाव समिती, संतभूमी बचाव समिती यांच्यावतीने शासनाला सादर करण्यात आला होता. त्यावर योग्य ती कार्यवाही व्हावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

प्रस्तावित कॉरिडॉर मध्ये श्री विठ्ठल मंदिर परिसरातील शेकडो घरे, मठ, धर्मशाळा, मंदिरे बाधित होणार आहेत. भाविकांच्या सेवासुविधाठी शासकीय जागा उपलब्ध असताना खाजगी मालमत्ता ताब्यात घेऊ नये अशी मागणी बाधितांनी केली आहे.

या मोटार सायकल रॅलीत सुमारे 500 पेक्षा अधिक बाइक व हजारो लोक सहभागी झाले होते. यामध्ये ह. भ. प. माउली महाराज गुरव, ह. भ. प. वडगावकर महाराज, बाबाराव महाजन बडवे, वैभव बडवे, व्यंकटेश कुलकर्णी, अनिल गवळी, गणेश लंके, विवेक बेणारे, जव्हेरी, येवनकर, उंडाळे, तसेच महिला आघाडीच्या बडवे, डॉ. बेणारे, वट्टमवार, लंके, आगरवाल यांच्यासह पंढरपूर तीर्थक्षेत्र बचाव समितीतील पदाधिकाऱ्यांसह अनेक नागरिक उपस्थित होते.