
सामना प्रतिनिधी । परळी वैजनाथ
काल जम्मू काश्मीर मधील पुलवामा जिल्ह्यात सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात चाळीस पेक्षा अधिक जवानांचे प्राण गेले. या भ्याड हल्ल्याने देशात संतापाची लाट उसळली असून सर्वच स्तरावरून नागरिकांच्या तीव्र प्रतिक्रिया येत आहेत. या पार्श्वभूमीवर समस्त परळीकरांनी एकत्र येत निषेध केला. राणी लक्ष्मीबाई टॉवर चौकात हजारों नागरीकांना शहिदांना श्रद्धांजली अर्पण केली.
पुलवामा येथे भारतीय सैनिकांवर झालेल्या हल्ल्याचा समस्त परळीकरांच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला. शहरातल्या राणी लक्ष्मीबाई टॉवर चौकात निषेध व्यक्त करुन शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी पाकिस्तान मुर्दाबाद, अमर रहे अमर रहे शहीद जवान अमर रहे, भारत माता की जय, जय जवान जय किसान, वंदे मातरम अशा घोषणा देण्यात आल्या. समस्त परळीकरांच्या वतीने शहीद सैनिकांना अभिवादन करत पाकिस्तानच्या कृत्याचा निषेध करण्यात आला.यावेळी महिलांचीही लक्षणीय उपस्थिती होती. शहरातील विविध पक्ष, संघटना, संस्था, सार्वजनिक जीवनात काम करणारे विविध क्षेत्रातील पदाधिकारी, वकील, डाॅक्टर्स, प्राध्यापक, पत्रकार, आदींसह सर्वस्तरीय नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.






























































