जनावरांच्या छावणीसाठी तहसीलदारांच्या दालनात आंदोलन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । पाथर्डी

जनावरांची छावणी चालवण्यासाठी आलेल्या प्रत्येक प्रस्तावाला मान्यता द्यावी या मागणीसाठी भाजप वगळता आज सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी तहसीलदारांच्या दालनातच धरणे आंदोलनाला सुरुवात केली. या विषयावर कोणताही अंतिम तोडगा सायंकाळी उशीरा पर्यंत न निघाल्याने हे आंदोलन सुरूच होते. तालुक्यातील सहा मंडळातून 104 संस्थांनी छावणी सुरू करण्यास परवानगी मिळावी अशी मागणी केली आहे.

महसूल प्रशासनाने सध्या करंजी येथील एका संस्थेलाच छावणी चालवण्यास परवानगी दिली आहे. ज्या छावणीला परवानगी दिली आहे ती परवानगी सत्ताधारी आमदार शिवाजी कर्डीले यांच्या शिफारशीवरून दिली आहे. त्यामुळे इतर संस्थांवर अन्याय झाला असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यासाठी आज जिल्हा परिषद सदस्य अनिल कराळे, माजी जिल्हा परिषद सदस्य शिवशंकर राजळे, बाजार समिती अध्यक्ष बन्सी आठरे, शिवसेनेचे माजी तालुका प्रमुख रफिक शेख, शहर प्रमुख भाऊसाहेब धस, अमोल वाघ, भगवान दराडे, रामराव चव्हाण, राजेंद्र गर्जे आदी कार्यकर्त्यांनी तहसीलदारांच्या दालनात धरणे आंदोलनाला सुरवात केली.

या विषयावर तहसीलदार नामदेव पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करत तोडगा काढण्याचा प्रयत्न केला मात्र लेखी आश्वासन दिल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही असा पवित्रा आंदोलकांनी घेतल्याने सायंकाळी उशिरा पर्यंत आंदोलन सुरूच होते. शासनाने एका मंडळात एकच छावणी देण्याचा निर्णय घेतल्याने तालुक्यात सहा मंडळात सहाच छावण्या सुरु होणार असल्याने पशुधन मालकांमध्ये नाराजीची भावना आहे. या बाबत बोलताना अनिल कराळे म्हणाले की, आमदार शिवाजी कर्डीले यांनी केलेल्या शिफारसीवरून करंजी येथील छावणीला मान्यता देण्यात आली आहे. आपल्या समर्थकांना छावणी चालवण्यास देताना जे इतर पात्र संस्था आहे त्या संस्थांवर अन्याय करण्यात आला आहे. तालुक्यात जनावरांची संख्या मोठी असल्याने ज्या सर्व संस्थांनी छावणी चालवण्यास परवानगी मागितली आहे त्या सर्व संस्थांना परवानगी द्यावी अशी मागणी यावेळी त्यांनी केली.