मराठा आंदोलनाचा भडका

29

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर

आरक्षणाच्या मागणीसाठी पेटलेल्या आंदोलनाचा सलग दुसऱया दिवशीही प्रचंड भडका उडाला. संभाजीनगर जिह्यात या मागणीसाठी आणखी एकाने नदीत उडी घेतली. तर एकाने विष घेतले. दुसरीकडे काकासाहेब शिंदे यांच्या मृत्यूसाठी कारणीभूत असलेल्या राज्य सरकारच्या निषेधार्थ मराठवाडय़ाच्या गावखेडय़ात कडकडीत बंद पाळण्यात आला. बंददरम्यान अनेक ठिकाणी बसेसवर तुफान दगडफेक करण्यात आली. लातुरात एकाने आत्मदहनाचा प्रयत्न केला. कायगाव येथे शिवसैनिक काकासाहेब शिंदे यांच्यावर हजारोंच्या उपस्थितीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आल्यानंतर आंदोलकांच्या संतापाचा भडका उडाला. जमावाने सरकारी वाहनांची जाळपोळ केली. जालना जिह्यातील घनसावंगी येथे संतप्त आंदोलकांना पांगवण्यासाठी हवेत गोळीबार करण्यात आला.

तुळजापुरात मराठा आरक्षणासाठी जागरण गोंधळ घातल्यानंतर परळी येथे आठ दिवसांपूर्वी मराठा क्रांती ठोक मोर्चा काढण्यात आला. सरकार आरक्षणासंबंधी जोपर्यंत लेखी आश्वासन देत नाही तोपर्यंत ठिय्या देणार असल्याचे मोर्चेकऱयांनी जाहीर केले. परळीतील ठिय्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मराठवाडाभर आंदोलनाचा वणवा पेटला. सोमवारी गंगापूर तालुक्यातील कायगाव येथे सकल मराठा कृती समितीने जलसमाधी घेण्याचे जाहीर केले होते. हे आंदोलन सुरू असतानाच काकासाहेब शिंदे यांनी गोदावरीत उडी घेतली. नदीचा प्रवाह वेगवान असल्याने अवघ्या दोनच मिनिटांत काकासाहेब यांचा बुडून मृत्यू झाला. सरकारच्या बेपर्वाईने त्यांचा बळी घेतल्याचा आरोप करत कृती समितीने आज महाराष्ट्र बंद पुकारला. जालना जिल्हय़ात घनसावंगी येथे जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबार केला. जमावाच्या दगडफेकीत पाच पोलीस जखमी झाले आहेत.

कायगावात संतापाचा कडेलोट
कायगावात काकासाहेब शिंदे यांच्यावर अंत्यसंस्कार झाल्यानंतर हा सगळा जमाव गोदावरीच्या नव्या पुलावर आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा ठाण मांडून बसला. या ठिकाणी रात्रीपासून विशेष पोलीस पथक, दंगाकाबू पथक तसेच पोलिसांचा वाढीव बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दुपारी अचानक या आंदोलनाला हिंसक वळण लागले. संतप्त जमावाने अग्निशमन दलाची गाडी पेटवून दिली. जमावाने तुफान दगडफेक करत पोलिसांना निशाणा बनवले. जमावाचा रोष पाहून पोलिसांनी या ठिकाणाहून काढता पाय घेतला.

राजकीय नेत्यांना धक्काबुक्की
काकासाहेब शिंदे यांच्या अंत्यसंस्कारासाठी पंचक्रोशीतून तुफान गर्दी लोटली होती. शिवसेना नेते खासदार चंद्रकांत खैरे, काँग्रेसचे आमदार सुभाष झांबड आदी अंत्यसंस्कारासाठी आले होते. मात्र या ठिकाणी कोणत्याही राजकीय नेत्याने येऊ नये असा पवित्रा घेत आंदोलकांनी खासदार खैरे व आमदार झांबड यांना धक्काबुक्की केली. गंगापूरचे भाजप आमदार प्रशांत बंब यांना तर कार्यकर्त्यांनी पिटाळून लावले.

काका-पुतण्याचा आत्महत्येचा प्रयत्न
मराठा आरक्षणासाठी संभाजीनगर जिल्हय़ातील देवगाव रंगारी येथील दोघांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. वेळगंगा नदीवरील निजामकालीन पुलावर मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी जयेंद्र द्वारकादास सोनवणे (२८) या तरुणाने पुलावरून ४० फूट खोल नदीपात्रात उडी मारली. तेथे असलेल्या तरुणांनी व पोलिसांनी धाव घेऊन जयेंद्रला घाटी रुग्णालयात पाठवले. त्याच्या पायाचे हाड मोडले असून प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले. आंदोलनस्थळापासून काही अंतरावर जगन्नाथ विश्वनाथ सोनवणे (५६) हे अत्यवस्थ स्थितीत आढळले. त्यांनी विष घेतले होते.

बंदोबस्तावरील पोलिसाचा हृदयविकाराने मृत्यू
बंदोबस्तावरील श्याम लक्ष्मण काडगावकर या पोलिसाचा हृदयविकाराने मृत्यू झाला. काडगावकर हे धाराशीव पोलीस मुख्यालयाचे कर्मचारी होते.

आंदोलनात ‘पेड’ मंडळी घुसलीत
मराठा आंदोलनात काही ‘पेड’ मंडळी घुसली असल्याचे धक्कादायक वक्तव्य महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. त्या वक्तव्याबद्दल मराठा समाजातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

मराठा आरक्षणावरून शिवसेनेचा लोकसभेत सभात्याग
महाराष्ट्रात व देशात सत्तेवर येण्यापूर्वी निवडणुकांमध्ये मराठा समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन भाजपने दिले होते. मात्र सत्तेवर आल्यानंतर आरक्षणासंदर्भात सरकारने कोणतेच पाऊल उचललेले नाही. त्यामुळे मराठा समाजात तीव्र असंतोष असून त्याचा भडका आता राज्यात उडाला आहे. या आंदोलनात एकाचा हकनाक बळी गेला आहे. त्यामुळे मराठा समाजाला सरकारने तातडीने न्याय द्यावा, अशी आग्रही मागणी करत शिवसेनेने सरकारच्या निषेधार्थ आज लोकसभेतून सभात्याग केला. लोकसभेत श्न्यू प्रहरात शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी महाराष्ट्रात मराठा आरक्षणाच्या मुद्दय़ावर पेटलेल्या आंदोलनाकडे सभागृहाचे लक्ष वेधले. २०१४ मध्ये निवडणुकांपूर्वी भाजपने मराठा समाजाला आरक्षण देऊ असे आश्वासन दिले होते. आता हा समाज आरक्षणाची मागणी करत असताना सत्ताधारी न्यायालयाकडे बोट दाखवत आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने ही परिस्थिती गांभीर्याने घ्यावी आणि राज्य सरकारला सूचना द्यावी अशी मागणी त्यांनी केली.

मराठा आंदोलनाला पश्चिम महाराष्ट्रात संमिश्र प्रतिसाद
मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी करण्यात आलेल्या जलसमाधी आंदोलनादरम्यान संभाजीनगरमधील तरुणाचा बळी गेल्याच्या घटनेचे संमिश्र प्रतिसाद पश्चिम महाराष्ट्रात उमटले. ठिकठिकाणी बंद पाळून भाजप सरकारचा तीक्र शब्दांत निषेध करण्यात आला. कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर आणि नगर जिह्यात ठिकठिकाणी एसटी बसेसवर दगडफेक, रस्त्यांवर टायर पेटविण्याचे प्रकार घडले. आंदोलनामुळे शाळा–महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली होती. कोल्हापुरात ऐतिहासिक दसरा चौकात बेमुदत ठिय्या आंदोलनाला सुरुवात करण्यात आली. नगर जिह्यातील संगमनेर, शेवगाव तालुक्यांमध्ये बसेसवर दगडफेक करण्यात आली. नगर शहरातून जाणाऱया चारही महामार्ग उद्या रोखण्यात येणार आहेत. सोलापुरात रविवार, २९ जुलैला शासनाच्या निषेधार्थ रूपाभवानी मंदिरात जागरण गोंधळ घालण्यात येणार असून, सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या निवासस्थानी पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. सातारा जिल्ह्यात आंदोलनाचे तीव्र पडसाद उमटले. पुणे-बंगळुरू महामार्गावर शिवशाहीसह इतर एसटी बसेसवर दगडफेक करण्यात आली. वाई, फलटण शहरात बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कराडमध्ये मराठा क्रांती संघटनेकडून ठिय्या आंदोलन करण्यात आले. दरम्यान, सातारा जिह्यात उद्या बंद पाळण्यात येणार आहे. सांगली जिह्यातील विटा शहरात दुचाकी रॅली काढण्यात आली, तर बंददरम्यान एसटी बसेसवर दगडफेक करून रस्त्यावर टायर जाळण्यात आले.

मुख्यमंत्र्यांमुळेच भडका उडाला – शरद पवार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यामुळेच मराठा आरक्षण आंदोलनाचा भडका उडाला, असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केला. शरद पवार यांनी प्रसिद्धीपत्रक काढून आपली भूमिका सविस्तरपणे मांडली. शरद पवार यांनी काढलेल्या या पत्रकात देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांचा स्पष्टपणे उल्लेख करण्यात आला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपुरात वारकऱयांच्या गर्दीत साप सोडून घातपात करण्याचा कट असल्याची गोपनीय माहिती मिळाल्याने सांगितले होते. याच कारणासाठी फडणवीसांनी पंढरपुरात विठ्ठलाच्या महापूजेला न जाण्याचा निर्णयही घेतला होता. याशिवाय महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनीही पंढरपुरात घातपाताचा कट असल्यासंदर्भात काही विधाने केली होती. या दोन्ही नेत्यांच्या वक्तव्यामुळेच परिस्थिती आणखी चिघळली. परिणामी मराठा आंदोलनाचा उद्रेक झाला, असे पवारांनी म्हटले. हे आंदोलन शांत करायचे असेल तर मुख्यमंत्र्यांनी मराठा क्रांती मोर्चेकऱयांशी तत्काळ संवाद साधावा, असेही पवार यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या