
हवामान खात्याने दिलेल्या इशाऱयानुसार मुंबईसह राज्यभरात थंडीचा कडाका वाढला आहे. आज गोंदियात पारा सर्वात कमी म्हणजे 8.4 अंश सेल्सिअसपर्यंत खाली घसरला तर पुण्यामध्येही तापमान घटले. ही स्थिती पुढील 48 तास कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
राज्याच्या विविध भागांत थंडीचा कडाका वाढला आहे. मात्र हे हवामान पुढील 48 तासांनंतर बदलण्यास सुरुवात होईल. यामध्ये सुरुवातीला तापमान 1 ते 2 अंशांनी कमी होईल. तर त्यानंतर तापमानात 2 ते 3 अंशांनी वाढ होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यानंतरच्या तीन दिवसांनंतर तापमान पुन्हा हळूहळू 3 अंशांनी कमी होणार सुरुवात होईल, असे हवामान खात्याचे म्हणणे आहे. मुंबईत आज सांताक्रुझ येथे 17.4, कुलाबा 22.0 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले, तर अहिल्यानगर 8.5, यवतमाळ 9.6, पुणे 10.4, नाशिक 9.8 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. उद्या कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात हवामान कोरडे राहण्याचा अंदाज हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आला आहे. मुंबई शहर आणि उपनगरात आकाश निरभ्र राहील. कमाल तापमान 34 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 17 अंश सेल्सिअसपर्यंत राहील असा अंदाजही हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.
उत्तर भारतात थंडीची लाट, बर्फवृष्टी
भारतीय हवामान खात्याच्या इशाऱयानुसार 18 डिसेंबरपासून 22 डिसेंबरपर्यंत उत्तर आणि दक्षिण भारतात जोरदार वारे, धुके, थंडीची लाट आणि काही ठिकाणी बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात मात्र विशेष फरक जाणवणार नाही. पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये 22 डिसेंबरपर्यंत दाट ते अतिदाट धुक्याचा इशारा देण्यात आला आहे. पंजाब, हरियाणाला ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.





























































