
उपराजधानीत होणाऱया हिवाळी अधिवेशनाच्या वेळी सहा दिवसात विधानभवनावर सुमारे 36 मोर्चे धडक देणार असून, त्यात एसटी कर्मचारी व विनाअनुदानित प्राध्यापकांच्या मोर्च्याचा समावेश आहे.
अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी म्हणजे 16 डिसेंबर रोजी सात मोर्चे विधानभवनावर धडक देणार आहेत. महाराष्ट्र राज्य कनिष्ठ वेतन कर्मचारी संघटनेच्या वतीने परिवहन मंडळाचे कर्मचारी 18 डिसेंबरला महामोर्चा काढणार आहेत. या मोर्चाचे नेतृत्व अजयकुमार गुजर करतील. मोर्चात परिवहन मंडळाचे कर्मचारी कुटुंबीयांसह सहभागी होणार आहेत. आतापर्यंत 36 संघटनांची मोर्चा काढण्यासाठी पोलिसांकडे परवानगी मागितली आहे. 17 तारखेला 7 तर 18 तारखेला 10 मोर्चे धडक देतील. आतापर्यंत बाहेर जिह्यातून जवळपास तीन हजार पोलिस अधिकारी आणि कर्मचारी उपराजधानीत दाखल झाले आहेत. पोलिस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी पोलिसांना व सुरक्षा व्यवस्था कायम ठेवण्यासाठी पोलिस प्रशासनाची भूमिका समजावून सांगितली. सोबतच बंदोबस्तासंदर्भात मार्गदर्शन केले. विधानभवनाकडे जाणाऱया पाचही मोर्चे पॉईटवर अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱयांची नियुक्ती करण्यात आली असून महिला पोलिसांचाही तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

























































