
पालकमंत्र्यांच्या मुलाचे नाव निमंत्रणपत्रिकेमध्ये यायला पाहिजे म्हणून प्रोटोकॉल बाजूला ठेवत त्यांचे नाव टाकण्यात आले. त्यामुळे महायुतीसह इतर पक्षांमध्येही उलटसुलट चर्चेने जोर धरला असून, प्रोटोकॉलची ऐशीतैशी अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पाहायला मिळाली आहे.
केंद्र शासन असो किंवा राज्य शासन, एखाद्या कार्यक्रमाची निमंत्रणपत्रिका कशी असावी, त्याची नियमावली ठरवून दिलेली आहे. त्याचे पालन सर्वांनाच करावे लागते. तसा प्रोटोकॉलसुद्धा निश्चित करून देण्यात आलेला आहे. त्याची अंमलबजावणी करण्याचे काम संबंधित यंत्रणेचे किंवा अधिकाऱ्यांचे असते. आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते राष्ट्रीय महामार्गाच्या कार्यक्रमाचे आयोजन लोणी येथे करण्यात आलेले होते. या कार्यक्रमाच्या निमंत्रणपत्रिकेत पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांचे सुपुत्र डॉ. सुजय विखे-पाटील यांचे नाव टाकण्यात आले. त्यावरून महायुतीमध्ये चांगलीच धुसफूस सुरू झालेली आहे.
वास्तविक पाहता, डॉ. सुजय विखे-पाटील यांच्याकडे कोणतेही पद नसताना त्यांचे नाव आले कसे? अशी चर्चा महायुतीसह इतर पक्षांमध्येही सुरू आहे. माजी खासदार म्हणून नाव टाकले असेल, तर दुसरीकडे श्रीरामपूर नगरपालिकेच्या कार्यक्रमांमध्ये तशाच पद्धतीने नाव टाकण्यात आले. माजी खासदार म्हणून नाव टाकायचे होते तर मिंधे गटाचे माजी खासदार सदाशिव लोखंडे यांचे नाव का टाकले नाही? असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे. त्यामुळे फक्त एकाच विशिष्ट नावासाठी हा आग्रह धरण्यात आला असल्यामुळे अनेक विषय आता पुढे येऊ लागले आहेत. कार्यक्रमपत्रिका कशा पद्धतीने करायची, कोणाकोणाची नावे टाकायची, हे निश्चित करायचे असेल तर त्यालाही प्रोटोकॉल आहे. त्याची काही नियमावली आखून देण्यात आलेली आहे. मग एकाचेच नाव टाकायचे, दुसऱ्याचे नाही, असा विषय का आला? त्यातच तीन पक्षांचे महायुती सरकार राज्यामध्ये एकत्रपणे काम करीत असल्यामुळे सगळ्यांचीच नावे यामध्ये का टाकण्यात आली नाही? असा सवाल आता पदाधिकारी व कार्यकर्ते जाहीरपणे विचारू लागले आहेत. एपंदरीतच पालकमंत्र्यांनी आपल्या मुलांच्या आग्रहासाठी वेळप्रसंगी प्रोटोकॉल बाजूला ठेवत आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने एकाच माजी खासदाराचे नाव निमंत्रणपत्रिकेत टाकल्यामुळे आता जिल्ह्यामध्ये यासंदर्भात चर्चा सुरू आहे.