दोन स्टारच्या प्रतीक्षेत असलेल्या अंमलदारांमध्ये असंतोष; पीएसआय होण्याच्या मार्गात अडसर

वर्ष 2013 मध्ये पीएसआयची विभागीय परीक्षा उत्तीर्ण होऊनही अद्याप हजारो पोलीस अंमलदारांचे पीएसआय बनण्याचे स्वप्न पूर्ण झालेले नाही. त्यापैकी अनेक जण निवृत्त झाले. तर बहुतेक अंमलदार सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर आलेत. गृहखात्याकडून हिरवा कंदीलदेखील मिळाला. मात्र पोलीस महासंचालक कार्यालयच या अंमलदारांच्या बढतीच्या मार्गात अडसर ठरत आहे.

2013 साली पोलीस अंमलदारांची विभागीय परीक्षा घेण्यात आली होती. त्यावेळी हजारो अंमलदार परिक्षा उत्तीर्ण झाले. पण अजूनही ते अंमलदार पीएसआय होण्याचे स्वप्न बघत आहेत. पोलीस महासंचालकाच्या दळभद्री कारभारामुळे त्या अमंलदारांच्या खांद्यावर अद्यापही दोन स्टार चढलेले नाहीत. त्यावेळी उपनिरीक्षक परीक्षेत उत्तीर्ण झालेल्यांना पोलीस महासंचालक कार्यालयाने पदोन्नती देण्यासाठी 2019 आणि 2020 मध्ये माहिती मागविली होती. राज्यातील उत्तीर्ण झालेल्या अमंलदारापैकी 318 अंमलदारांची संवर्ग सहित संपूर्ण माहिती पोलीस महासंचालक कार्यालयाने गेल्या सहा महिन्यांपासून प्रलंबित ठेवली. ही माहिती मागविण्यात पूर्वी गृह विभागाची परवानगी घेतली होती. त्यामध्ये विशेष करून कायदा विभाग आणि महसूल विभागाची देखील परवानगी समाविष्ट होती.

28 सप्टेंबर रोजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी 2013 मध्ये पीएसआय अर्हता परीक्षा उत्तीर्ण झालेल्या अंमलदारांना पदोन्नती देण्याची मान्यता दिली. असे असतानाही पोलीस महासंचालक कार्यालयाकडून काहीच हालचाल होत नसल्याचे आरटीआय कार्यकर्ता अनिल गलगली यांनी माहिती अधिकाराखाली घेतलेल्या माहितीतून स्पष्ट झाले आहे. आपल्या वरिष्ठांकडूनच दखल घेतली जात नसल्याने अंमलदारांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक अमंलदार सेवानिवृत्तीच्या उंबरठय़ावर असून दोन स्टार मिळण्याचे स्वप्न हे स्वप्नच राहते की काय अशी खदखद ते व्यक्त करीत आहेत.

राज्यातील 16 ‘मपोसे’ अधिकाऱ्यांना आयपीएस दर्जा
गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या महाराष्ट्र पोलीस सेवेतील 16 अधिकाऱ्यांना अखेर आयपीएस मिळाले. या सर्व अधिकाऱ्यांना भारतीय पोलीस सेवेत समाविष्ट करताना त्यांना महाराष्ट्र कॅडर देण्यात आले. वर्ष 2017 साठी राज्यातील मपोसे अधिकारी एस.जी. वायसे पाटील, ए.एम.बाजगल, एन.टी.ठाकूर, एस.एल.सरदेशपांडे, नितीन पवार आणि डी.पी. प्रधान या सहा जणांना तर 2018 वर्षाकरिता शीला साहिल (एम.एम.मोहिते), पांडुरंग पाटील, टी.सी. दोसी, बी.बी.पाटील (वाघमोडे), एस.एस.बुरसे, सुनिता साळुंखे-ठाकरे, एस.एम. परोपकारी, एस.एस. घारगे, रविंद्रसिंग परदेशी आणि पुरषोत्तम कराड या अधिकाऱ्यांना आयपीएस मिळाले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या