
आधीच आर्थिक संकटात असलेल्या पाकिस्तानी सुपर लीगचे (पीएसएल) ग्रहच नव्हे, तर तारेही फिरले आहेत. पाकिस्तानच्या दहशतवादी संघटनेने ऑस्ट्रेलियन संघ परदेशी खेळाडूंना मैदानात न उतरण्याची धमकी दिल्यामुळे खेळाडूच नव्हे, तर पीएसएलच संकटात सापडली आहे. या धमक्यांमुळे पीएसएलच्या अडचणीत वाढ झाल्यामुळे 26 मार्चपासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेच्या आयोजनावरच अनिश्चिततेचे ढग पसरले आहेत.
विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानातील ‘जमात-उल-अहरार’ या दहशतवादी संघटनेने डेविड वॉर्नर, स्टीव्ह स्मिथ आणि डॅरिल मिचेल यांच्यासारख्या स्टार खेळाडूंना पीएसएलमध्ये सहभागी होऊ नये, असा इशारा दिला आहे. परदेशी खेळाडू पाकिस्तानात आले तर त्यांच्या सुरक्षेची कोणतीही खात्री नाही, असा धमकीवजा इशारा देण्यात आला आहे. क्रिकेट बोर्डांनी आपल्या खेळाडूंना पाकिस्तानात पाठवू नये. काही घडल्यास आम्ही जबाबदार राहणार नाही. सामने होऊ नयेत यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू. या दहशतवादी संघटनेच्या कमांडरच्या विधानामुळे क्रिकेटविश्वात खळबळ उडाली आहे.
पीएसएलसमोर मोठं आव्हान
यापूर्वीच पीसीबीप्रमुख मोहसिन नकवी यांनी पीएसएल मर्यादित शहरांमध्ये आणि प्रेक्षकांविना घेण्याचा निर्णय जाहीर केला होता. पश्चिम आशियातील संघर्ष आणि वाढत्या इंधनदरांचा त्यामागे उल्लेख होता. मात्र आता सुरक्षेचा प्रश्न अधिकच तीव्र बनला आहे.
त्यातच या हंगामात अॅडम झम्पा, मोईन अली, डेव्हन कॉनवे यांच्यासारखे आंतरराष्ट्रीय खेळाडू सहभागी होणार होते, पण सध्याच्या परिस्थितीत त्यांच्या सहभागाबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. अनेक क्रिकेट मंडळे आणि खेळाडू आता नव्याने विचार करत आहेत.






























































