बाप्पाचे शनिवारी वाजत-गाजत आगमन; जटोली शिवमंदिर, शिवालय, स्वानंद निवास हे अनोखे देखावे

लाडक्या गणरायाचे शनिवारी सर्वत्र वाजत-गाजत आगमन होणार आहे. घरोघरी, सार्वजनिक गणपती मंडळांनी बाप्पाच्या आगमनाची जोरदार तयारी केली आहे. दुपारी 1.30  पर्यंत गणरायाची प्रतिष्ठापना होणार आहे. शहरातील मानाचे आणि प्रमुख गणपतींची विविध स्थांतून वाजत-गाजत मिरवणूक निघणार असून, आकर्षण देखाव्यात बाप्पा विराजमान होणार आहेत.

ग्रामदैवत कसबा ग्रामदैवत मानाचा पहिला श्री कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, ह्यावर्षी ‘श्रीक्षेत्र सिद्धटेक देवस्थानचे’ प्रतीकात्मक स्वरूप देखावा म्हणून सादर करणार आहे. अष्टविनायकांपैकी एक हे म्हणजे सिद्धटेकचा सिद्धिविनायक गणपती, ह्या मंदिराला वेगळा असा इतिहास आहे.

तांबडी जोगेश्वरी : ‘श्रीं’चा आगमन सोहळा पूर्वीप्रमाणेच पारंपरिक पद्धतीत होणार आहे. आगमनाची मिरवणूक सकाळी 10 वाजता नारायण पेठेतील केळकर रस्त्यावरील मंदार लॉज येथून निघेल व कुंटे चौक, नगरकर तालीम चौक, अप्पा बळवंत चौक मार्गे ती उत्सव मंडपात पोहोचेल.

गुरुजी तालीम : फुलांच्या गज रथातून मिरवणूक निघेल. मिरवणूक गुरुजी तालीम मंदिर गणपती चौक, लिंबराज महाराज चौक, अप्पा बळवंत चौक, जोगेश्वरी चौक आणि बेलबाग चौकातून उत्सव मंडपात येईल. गणेशाची प्रतिष्ठापना युवा उद्योजक पुनीत बालन व जान्हवी धारिवाल-बालन यांच्या हस्ते होणार आहे.

तुळशीबाग : यंदा मंडळाने ओरिसातील पुरी येथील श्री जगन्नाथ मंदिरातील गर्भगृह आणि प्रवेशद्वाराची सजावट केली आहे. पेशवेकालीन श्रीराम मंदिरापासून प्रभू श्रीरामचंद्राच्या पालखीतून सकाळी पूजेच्या मूर्तीची प्रतिष्ठापनेची मिरवणुकीला सुरुवात होणार आहे. गणरायाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना उद्योजक कृष्णकुमार गोयल आणि त्यांच्या पत्नी यांच्या हस्ते होईल.

केसरीवाडा : मानाचा पाचवा गणपती असलेल्या केसरीवाडा गणेशोत्सव मिरवणूक प्रथेप्रमाणे पालखीतून काढली जाणार आहे. मिरवणुकीत गंधाक्ष आणि श्रीराम ढोल- ताशा पथकाचे वादन होणार आहे. श्रीगणेश मूर्तीच्या प्रतिष्ठापनेला डॉ. दीपक टिळक, डॉ. गीताली टिळक, रोहित टिळक, डॉ. प्रणती टिळक उपस्थित राहणार आहेत.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई : श्रीमंत दगडू‌शेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने हिमाचल प्रदेशमधील जटोली शिवमंदिराची प्रतिकृती साकारण्यात आली आहे. गणेश चतुर्थीला सकाळी 11 वाजून 11 मिनिटांनी कर्नाटक हुमनाबाद येथील श्री दत्त संप्रदायाचे श्री ज्ञानराज महाराज माणिकप्रभू यांच्या हस्ते ‘श्रीं’ची प्रतिष्ठापना होणार आहे.

अखिल मंडई मंडळ फुलांनी सजलेल्या भव्य त्रिशूळ रथातून अखिल मंडई मंडळाच्या शारदा गजाननाची आगमन मिरवणूक निघणार आहे. सकाळी 10 वाजता आगमन मिरवणुकीची सुरुवात होईल. गणेशाची प्रतिष्ठापना दुपारी 12 वाजता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र. कुलगुरू डॉ. पराग काळकर आणि त्यांच्या पत्नी अंजली काळकर यांच्या शुभहस्ते होणार आहे.