
कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिह्याच्या हद्दीतील वनक्षेत्रात सुरू असलेल्या ‘हत्ती पकड’ मोहिमेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. या धरपकड मोहिमेवर तातडीने बंदी घालण्याची मागणी करणारी जनहित याचिका हायकोर्टात दाखल झाली आहे.
याचिकेच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने राज्य शासनाला याबाबत माहिती सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी 3 नोव्हेंबर रोजी होणार आहे. रत्नागिरी येथील सामाजिक कार्यकर्ते रोहन कांबळे यांनी ही जनहित याचिका दाखल केली आहे. ऍड. मकरंद कर्णिक आणि ऍड. शर्मिला देशमुख यांच्या खंडपीठासमोर याची सुनावणी झाली. याचिकाकर्त्यांनी मागणी केली आहे की, कोल्हापूर-सिंधुदुर्ग वनविभागाने हत्तींची धरपकड त्वरित थांबवावी. तसेच हत्तींचा मानवी वस्तीमधील वावर आणि त्यांच्या स्थलांतराबाबत योग्य ती माहिती न्यायालयात सादर करावी.
सध्या दोडामार्ग तालुक्यात 4 हत्ती असून, ‘ओंकार’ नावाचा हत्ती मडूरा पंचक्रोशीत वास्तव्य असून त्यांच्याकडून शेती आणि बागायतीचे नुकसान होत आहे. यामुळे हत्ती पकड मोहीम राबवून हत्तींना जेरबंद करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. या पार्श्वभूमीवर ‘ओंकार’ हत्तीला 31 डिसेंबरपर्यंत पकडण्याची परवानगी प्रशासनाला मिळाली आहे आणि हत्ती पकड मोहिमेने वेग घेतला आहे. मात्र, याचिका दाखल झाल्याने ही मोहीम बारगळण्याची शक्यता आहे.
ओंकारमुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प, हत्ती इन्सुलीत स्थिरावला
कास-मडुरा परिसरात गेल्या काही दिवसांपासून स्थिरावलेल्या ‘ओंकार’ नावाच्या हत्तीने आज थेट मुंबई-गोवा महामार्गावर हजेरी लावली. महामार्गावर अचानक हत्ती दिसल्यामुळे त्या ठिकाणी मोठी गर्दी झाली. अनेक नागरिकांनी आपल्या कॅमेऱ्यात त्याचे फोटो कैद केले.
या घटनेमुळे झाराप -पत्रादेवी- गोवा चौपदरी महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी थांबली होती. मिळालेल्या माहितीनुसार, ’ओंकार’ हत्ती त्या ठिकाणी काही वेळ थांबून आता इन्सुली भागात स्थिरावला आहे.
हत्ती पुन्हा महामार्गावर येऊ नये यासाठी वन विभागाचे प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती सावंतवाडी वन विभागाचे अधिकारी सुहास पाटील यांनी दिली. महामार्गावरील या हत्तीच्या दर्शनाने परिसरातील नागरिकांमध्ये उत्सुकता आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.


































































