
उत्तर प्रदेश सरकारने कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील स्टार्टअप Puch AI सोबत झालेला 25 हजार कोटींचा सामंजस्य करार रद्द केला आहे. कंपनीच्या विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील सरकारने 23 मार्च रोजी झालेल्या या कराराचा आढावा घेतल्यानंतर तो रद्द करण्याचा निर्णय घेतला. सरकारने सांगितले की, नियमानुसार आवश्यक तपशील गुंतवणूकदाराकडून मागवण्यात आले होते, मात्र ते वेळेत सादर करण्यात आले नाहीत. त्यामुळे सरकारने या कंपनीची पडताळणी केली. तेव्हा ही कंपनी आर्थिक सक्षम नसल्याचे समोर आले.
राज्य सरकारच्या गुंतवणूक प्रोत्साहन संस्था Invest UP च्या माध्यमातून याबाबत माहिती देण्यात आली. “नियमांनुसार आवश्यक तपशील मागवण्यात आले, परंतु ते वेळेत सादर करण्यात आले नाहीत. पडताळणीमध्ये आवश्यक आर्थिक क्षमता नसल्याचे दिसून आले. राज्य सरकारच्या निर्देशानुसार हा करार तत्काळ प्रभावाने रद्द करण्यात येत आहे. यापुढे कोणतेही हक्क किंवा जबाबदाऱ्या राहणार नाहीत,” असे स्पष्ट करण्यात आले.
सरकारने पुढे सांगितले की, पारदर्शकता आणि प्रशासनातील उच्च नैतिकतेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, या करारावर आधीपासूनच कंपनीच्या पात्रतेबाबत टीका होत होती. त्यामुळे दोन्ही बाजूंनी स्पष्टीकरण देण्यात आले होते आणि राज्याच्या गुंतवणूक विभागाकडून सखोल पडताळणी प्रक्रिया सुरू करण्यात आली होती.
पच एआयचे सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धार्थ भाटिया यांनी यापूर्वी कंपनी आर्थिकदृष्ट्या सक्षम असल्याचा दावा केला होता, मात्र त्यांनी आर्थिक तपशील उघड करण्यास नकार दिला होता.
या गुंतवणुकीबाबत त्यांनी सांगितले होते की हा प्रकल्प सार्वजनिक-खासगी भागीदारी पद्धतीने राबवला जाणार आहे. या प्रकल्पामुळे राज्यातील करदात्यांवर कोणताही खर्च येणार नाही, उलट राज्यात गुंतवणूक वाढेल. प्रकल्प टप्प्याटप्प्याने पूर्ण केला जाईल आणि बाह्य गुंतवणूकदारांचा पाठिंबा असेल. सरकारकडून कोणतीही आर्थिक मदत किंवा सुविधा घेतलेली नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले होते.
तथापि, आवश्यक तपशील आणि आर्थिक क्षमता सिद्ध करण्यात अपयश आल्यामुळे अखेर राज्य सरकारने हा करार रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.






























































