किराणा माल विक्रेत्याकडून खंडणी उकळणारे सराईत जेरबंद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मी इथला भाई आहे, माझ्यामध्ये कोणी आले तर सोडणार नाही, असे म्हणत कोयता हवेत फिरवून किराणा माल विक्रेत्याला धाक दाखवून खंडणी उकळणाऱ्या दोघा सराईतांना बिबवेवाडी पोलिसांनी अटक केली. ही घटना 10 जुलैला रात्री पावणेदहाच्या सुमारास बालाजी सुपर मार्केटमध्ये घडली.

यश उर्फ कुंदन शिंदे (20) आणि अक्षय शैलेंद्र भालके (वय 19, दोघे रा. अप्पर इंदिरानगर ओटा वसाहत, बिबवेवाडी) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. महादेव मांगीलाल जाट (वय 33, रा. ओटा वसाहत, बिबवेवाडी) यांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

महादेव जाट यांचे ओटा वसाहत परिसरात बालाजी सुपर मार्केट किराणा माल विक्रीचे दुकान आहे. 10 जुलैला रात्री साडेनउच्या सुमारास सराईत शिंदे आणि भालके त्यांच्या दुकानात गेले. तुला व्यवसाय करायचा असले तर दरमहा हप्ता द्यावा लागेल, अशी धमकी त्यांनी दिली. कोयत्याचा धाक दाखवून जाट यांच्या दुकानातील गल्ल्यातील 1 हजार 800 रुपये घेतले. आणखी पैसे देण्यास नकार दिल्यानंतर आरोपींनी परिसरात दहशत माजविली. आम्ही परिसरातील भाई असून पैसे न दिल्यास जीवे मारु, अशी धमकी देऊन जाट यांच्यावर कोयता उगारला. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक संजय आदलिंग तपास करत आहेत.