पुण्यात बुलेटच्या फटाका ‘सायलेन्सर’वर बुलडोझर, 571 वाहनांचे सायलेन्सर जप्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बुलेटच्या सायलेन्सरमध्ये मॉडीफाय करून कर्णकर्कश आवाज करीत फिरणार्‍या बुलेटस्वारांना शहर वाहतूक पोलिसांनी चांगलाच दणका दिला आहे. दोन दिवसांत तब्बल 571 बुलेटवर कारवाई करून सायलेन्सर जप्त करण्यात आले. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई देखील करण्यात आली असून जप्त केलेल्या सायलेन्सरवर वाहतूक पोलिसांनी बुलडोझर चालविला. यापुढे देखील ही कारवाई सुरू राहणार असल्याची माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे यांनी दिली.

शहर परिसरात बुलेटच्या सायलेन्सरमध्ये बदल करून कर्णकर्कश आवाज करत फिरणार्‍यांची संख्या मोठी आहे. दुचाकी आणि विशेषतः बुलटेच्या सायलेन्सरवर बदल केल्यानंतर त्याचा मोठ्या प्रमाणात आवाज होतो. अशी वाहने रस्त्यावरील नागरिक तसेच इतर दुचाकीस्वारांना धडकी भरवितात. शाळा, महाविद्यालये, रुग्णालय परिसरातून जात असताना याचा सर्वसामान्यांना मोठा त्रास सहन करावा लागतो. तसेच, ध्वनीप्रदुषणात मोठी वाढ होते. या सर्व पार्श्वभूमीवर शहर वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे यांनी मागील दोन दिवसांत शहरात विशेष मोहीम राबविली. यामध्ये कर्णकर्कश आवाज करणार्‍यांवर कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी केल्या होत्या. त्यानूसार शहरातील सर्वच भागात ही मोहीम राबविण्यात आली. त्याअंतर्गत सुमारे 571 दुचाकींवर कारवाई करून त्या जप्त करण्यात आल्या. विशेषतः हडपसर, कोरेगाव पार्क, विमानतळ, हांडेवाडी, डेक्कन, भारती विद्यापीठ भागात हे प्रकार सर्वाधिक असल्याचे कारवाईतून स्पष्ट झाले. कारवाई केलेल्या वाहनधारकांकडून पहिल्या गुन्ह्यासाठी हजार तर दुसर्‍या गुन्ह्यासाठी दोन हजार रूपये दंड वसूल करण्यात आला. तर, मॉडीफाय केलेले सायलेन्सरचा पुनर्वापर होवू नये, यासाठी पोलिसांनी ते जप्त केले. शुक्रवारी येरवडा येथील वाहतूक शाखेच्या कार्यालयात या सायलेन्सरवरून बुलडोझर चालवून ते निकामी करण्यात आले.

शहर परिसरात वाहतूक नियमभंग करणार्‍यांची संख्या मोठी आहे. अशा बेशिस्त चालकांमुळे वाहतूक कोंडी, अपघातांचे प्रकार घडतात. त्यामुळे आता वाहतूक शाखा अ‍ॅक्शन मोडवर आली असून विविध प्रकारचे नियमभंग करणार्‍यांवर कारवाईची मोहीम हाती घेण्यात आली आहे.

…नागरिकांनो येथे करा तक्रार
नियमबाह्य पद्धतीने सायलेन्सरमध्ये बदल करणे तसेच इतर वाहतूक नियमभंग करणार्‍यांबाबत तक्रार करण्यासाठी नागरिकांनी 8087240400 या व्हॉट्सअ‍ॅप नंबरवर संपर्क करावा, असे आवाहन वाहतूक शाखेकडून करण्यात आले आहे.

मॉडीफाय सायलेन्सरवर कारवाई करण्यात आली असून यापुढेही कारवाई सुरूच राहील. दुचाकीस्वारांनी नियम पाळणे गरजेचे आहे.
– शशिकांत बोराटे, पोलीस उपायुक्त, वाहतूक शाखा.