
सामना ऑनलाईन, मुंबई
दहशतवादी हल्ल्याची अफवा पसरवणं एका उद्योजकाला महागात पडलं आहे. प्रदीप रसाळ असं या उद्योजकाचं नाव असून तो मूळचा पुण्याचा आहे. रसाळने राज्याच्या विविध भागात दहशतवादी हल्ले होणार असल्याची अफवा पसरवली होती.
रसाळ हा रविवारी मुंबईमध्ये आला होता. त्याने त्याच दिवशी विले पार्ले पोलीस स्थानक गाठलं आणि पोलिसांना सांगितलं की पश्चिम द्रुतगती मार्गावर त्याने काही जणांना हिंदी आणि उर्दूमध्ये बोलताना ऐकले. हे लोकं गणेश चतुर्थीला मुबई,पुणे,नाशिक,नागपूर,कोल्हापूर इथे स्फोट घडवण्याबाबत बोलत होते असं पोलिसांना सांगितलं . ही बाब पोलिसांनी तत्काळ दहशतवादविरोधी पथकाला कळवली. दोन दिवस पोलीस रसाळने दिलेल्या माहितीची पडताळणी करत होते, मात्र त्यांना काहीही सापडलं नाही. रसाळ सखोल माहिती द्यायला टाळाटाळ करत होता. धागेदोरे सापडत नसल्याने आणि रसाळ नीट माहिती देत नसल्याने त्याच्यावर पोलिसांना संशय यायला लागला होता. रसाळ याची नीट चौकशी केली असता त्याने आपण खोटं बोलल्याचं कबूल केलं. दहशतवादी हल्ल्यांचे बरेच चित्रपट बघितल्याने रसाळवर त्याचा परिणाम झाला होता. यामुळे त्याने हा खोडसाळपणा करायचं ठरवल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.






















































