
महापालिका आयुक्त नवल किशोर राम आणि जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी शहराची पाहणी करत शहरातील स्वच्छतेसह रस्ते, खड्डे, अनधिकृत होर्डिंग्ज आदींचा आढावा घेतला. शहर पूर्णतः स्वच्छ राहील, नागरिकांना चांगल्या सुविधा मिळतील याबाबत महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. तसेच यापुढे शहर रात्रीत स्वच्छ करण्याचे त्यांनी आदेश दिले.
महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्यासोबत जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सर्व खातेप्रमुख यांना घेऊन शहराची शनिवारी सकाळी सहा वाजता पाहणी केली. पाहणीमध्ये महापालिका हद्दीतील कॅम्प परिसरपासून पुणे स्टेशन, कसबा पेठ, शनिवारवाडा, युनिव्हर्सिटी, औंध, बालेवाडी, बाणेर, पाषाण, डेक्कन या भागामध्ये पाहणी केली. महापालिकेची यंत्रणा प्रत्यक्षात कसे काम करते. हे पाहण्याचा मुख्य उद्देश या पाहणी दौऱ्याचा होता. या वेळी रस्ते, पदपथ रस्त्यावरील कचरा, अनधिकृत होर्डिंग, बोर्ड, बॅनररस्त्यावरील अनावश्यक विद्युत पोल, पावसात रस्त्यावर पाणी साठण्याची ठिकाणे, रस्त्यावरील राडारोडा, अनावश्यक पडलेले ड्रेनेज व पाणीपुरवठ्याचे पाईप, त्याचबरोबर नागरिक रस्त्यावर कचरा टाकणार नाहीत, यासाठी करावयाच्या उपाययोजना व सार्वजनिक व्यवस्था याबद्दल पाहणी केली. शहर पूर्णतः स्वच्छ राहील. नागरिकांना चांगल्या सुविधा मिळतील याबाबतीत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. या प्रसंगी संबंधित विभागाचे खातेप्रमुख, उपायुक्त व अधिकारी उपस्थित होते.
पुण्याला स्वच्छतेत देशातील एक नंबर शहर बनवण्याचा मानस आहे. त्यासाठी यंत्रणा व्यवस्थित चालली पाहिजे. स्वच्छता कर्मचाऱ्यांनी वेळेवर कामावर हजर राहावे, तसेच इतर विभागाने सामूहिक जबाबदारीने काम करावे, अशा सूचना दिल्या आहेत. शहराची स्वच्छता करण्यासाठी विचार सुरू आहे. नागरिकांचा सहभाग वाढविण्यासाठी त्यांचे प्रबोधन केले जाईल.
नवल किशोर राम, आयुक्त, पुणे महापालिका
घनकचरा विभाग सुधारणार का?
शहर स्वच्छ कसे केले जाते, याची यंत्रणा समजून घेत रात्रीच शहर स्वच्छ झाले पाहिजे, अशी भूमिका आयुक्तांनी घेतली. खाते प्रमुखांनी आपल्या कामाची जबाबदारी दुसऱ्या विभागांवर न ढकलता सामूहिक पध्दतीने काम करण्याच्या सूचना दिल्यात. सामूहिक जबाबदारीचे काम केल्याशिवाय शहराचा चेहरा बदलणार नसल्याचे आयुक्तांनी ठणकावले. त्यामुळे केवळ ठेकेदारांचे भले करण्याच्या कारभारात अडकलेला घनकचरा विभाग आता तरी ताळ्यावर येणार का हे पाहणे जरुरीचे ठरणार आहे.























































