
बहिणीच्या संपर्कात आल्याच्या कारणावरुन एकाने तरुणाच्या डोक्यात पालघनाने वार करुन त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तर तरुणाला वाचविण्यासाठी पुढे आलेल्या त्याच्या दोन मित्रांना आरोपीने जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना शनिवारी रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास कोरेगाव पार्क परिसरातील संत गाडगे महाराज वसाहतीमध्ये घडला.
ऋतीक राजेश घाडगे (वय 19, रा. कोरेगाव पार्क) असे पोलिसांनी अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. तर आकाश अशोक औसरमल (वय 22, रा. संत गाडगे महाराज वसाहत, कोरेगाव पार्क) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी आकाशचा भाऊ रतन औसरमल (वय 24) याने कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी एकाच परिसरात राहतात. फिर्यादीचा भाऊ आकाश हा टेम्पोचा व्यवसाय करतो. शनिवारी रात्री लक्ष्मीपुजनाच्या दिवशी टेम्पोची पुजा झाल्यानंतर आकाश हा त्याच्या मित्रांसमवेत त्यांच्याच वस्तीमध्ये बोलत उभा होता. त्यावेळी फिर्यादीच्याच वस्तीमध्ये राहणारा ऋतीक घाडगे तेथे आला. त्याने आकाश हा त्याच्या बहिणीच्या संपर्कात आल्याच्या कारणावरुन ऋतीकने त्याच्या हातातील पालघन या लोखंडी हत्याराने आकाशाच्या मानेवर व जबड्यावर वार करीत त्यास जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात आकाश गंभीर जखमी झाला. त्यावेळी आकाशला वाचविण्यासाठी त्याचे दोन मित्र दिपक भंडारी व हरीश येरबल यांनाही आरोपीने जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक डी. एस. शिंदे करीत आहेत.


























































