पुणे – हडपसरमध्ये तरूणावर गोळीबारप्रकरणी दोघांविरूद्ध गुन्हा

हॉटेलमध्ये गोळीबार करून तरूणाला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी मुंढवा पोलिस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 16 जून 2018 रोजी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली होती. सचिन पोटे, अजय शिंदे व इतरांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशाल सतीश मोदी (वय 45, रा. कोरेगाव पार्क) यांनी तक्रार दिली आहे. विशाल यांनी काल गुन्हे शाखेत जाऊन तक्रार अर्ज दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हडपसर रेल्वे स्टेशन परिसरातील हॉटेल वायकीकी येथे पार्टी सुरू होती. त्यावेळी पार्टीसाठी आलेल्या निलेश चव्हाण याचे स्वागत हॉटेल पार्टनर रिषभ गुप्ता याने माईकवर वारंवार चव्हाण यांच्या नावाची घोषणा केली. त्यामुळे हॉटेलमध्ये आलेल्या सचिन पोटे, अजय शिंदे या आरोपींचा अहंभाव दुखावला. त्यामुळे त्यांनी निलेश चव्हाण यांच्यावर पिस्तूलातून दोन गोळ्या झाडल्या. मात्र, निलेशने खाली वाकून गोळीबार चुकवित जीव वाचविला होता. त्यामुळे हॉटेलमध्ये गोंधळ उडाला होता. त्यानंतर आरोपींनी हॉटेलची तोडफोड करून तेथील डीव्हीआर जबरदस्तीने घेऊन गेले होते. याप्रकरणी विशाल यांनी घाबरल्यामुळे कालपर्यंत तक्रार देण्यास उशीर केला होता. गुरुवारी त्यांनी गुन्हे शाखेच्या युनिट चारच्या कार्यालयात जाऊन तक्रार दिल्यानंतर आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या