बदलापूर येथील घटनेनंतरही लहान मुलींवरील अत्याचार सुरूच आहेत. पिंपरीत अशा दोन घटना उघडकीस आल्या. मैत्रिणीला घरी सोडून आपल्या घरी परत येत असलेल्या 10 वर्षीय मुलीसोबत एकाने गैरवर्तन केले. त्यानंतर तिला जबरदस्तीने दुचाकीवर बसवून पळवून नेण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. हा धक्कादायक प्रकार बुधवारी (28 रोजी) दुपारी साडेतीनच्या सुमारास खेड तालुक्यातील निघोजे येथे घडला.
प्रसाद ज्ञानेश्वर कुंभार (वय 35, रा. नढेनगर, काळेवाडी; मूळ रा. वीर, ता. पुरंदर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. 30 वर्षीय महिलेने म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांची 10 वर्षीय मुलगी मैत्रिणीला तिच्या घरी सोडण्यासाठी गेली. मैत्रिणीला घरी सोडून परत येत असताना मोकळ्या जागेत थांबलेल्या आरोपीने मुलीचा हात जबरदस्तीने पकडला. तिच्याशी गैरवर्तन करून तिला जबरदस्तीने दुचाकीवर बसवून पळवून नेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी मुलीने आरडाओरडा केला. तसेच आरोपीला धक्का दिला. त्यामुळे मुलगी आरोपीच्या तावडीतून सुटली. त्यानंतर आरोपी मुलीला सोडून पळून गेला. पोलिसांनी आरोपी कुंभार याला अटक केली. सहायक पोलीस निरीक्षक कुथे तपास करीत आहेत.