जागा खाली करायला नकार दिल्यामुळे तरूणावर कोयत्याने वार, तिघा सराईतांना अटक

व्यवसायाची जागा खाली करण्यास नकार दिल्यामुळे टोळक्याने तरूणाला शिवीगाळ करून त्याच्यावर कोयत्याने वार करून गंभीररित्या जखमी केले आहे. ही घटना दोन दिवसांपूर्वी संध्याकाळी पावणेसातच्या सुमारास हडपसरमधील गाडीतळ परिसरात घडली. या प्रकरणी तिघा सराईतांना पोलिसांनी अटक केले आहे.

अवतारसिंग कतारसिंग टाक (वय – 26), जपानसिंग कतारसिंग टाक (वय – 28), सोरनसिंग कतारसिंग टाक (वय – 20) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तुफानसिंग टाक आणि ओंकारसिंग टाक यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रवी सुरेश धोत्रे (वय – 36, रा. हडपसर) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. त्यांनी हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गाडीतळ परिसरातील तुळजाभवानी वसाहत कॅनोलच्या कडेला रवी यांचा हॉटेल व्यवसाय आहे. दोन दिवसांपूर्वी सराईत आरोपींनी रवीला वापरत असलेली जागा खाली करण्यास सांगितले. रवीने जागा खाली करण्यास नकार दिल्यामुळे आरोपींनी त्याला शिवीगाळ करून कोयत्याने वार केला. या प्रकरणी हडपसर पोलीस तपास करीत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या