अर्धनग्न तरूणाने तरुणीचा पाठलाग करून केला जबरदस्तीचा प्रयत्न, पुण्यातील घटनेने खळबळ

कंपनीतून सुटल्यानंतर पहाटे घरी निघालेल्या आयटी इंजिनिअर तरुणीचा रस्त्यामध्ये अर्धनग्न तरूणाने पाठलाग केला. त्यामुळे तरुणी घाबरून स्पीड ब्रेकरवर पडल्यानंतर तरुणाने तिचे कपडे फाडून जबरदस्तीचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार मुंढव्यातील केशवनगर परिसरात गुरूवारी पहाटे घडला. या प्रकरणी 27 वर्षीय तरूणीने मुंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार एका अनोखळी व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी एका नामांकित आयटी कंपनीत नोकरीला आहे. गुरूवारी पहाटे पावणे चारच्या सुमारास काम संपवून ती घरी निघाली होती. दुचाकीवरून केशवनगर येथून घरी जात असताना एकाने तिचा पाठलाग सुरू केला. त्या व्यक्तीच्या तोंडाला मास्क होता. अंगात शर्ट देखील नव्हता. त्यामुळे तरूणीने घाबरून दुचाकी वेगाने चालविली.

घराजवळील सोसायटी परिसरात असलेल्या एका स्पीड ब्रेकरवर दुचाकी वेगात आपटल्यामुळे तरुणी खाली पडली. तरूणाने तिच्या जवळ येऊन कपडे फाडून जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. तरूणीने आरडा-ओरडा केल्यामुळे तो पळून गेला. त्यानंतर तरूणीने पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी परिसरातील सीसीटीव्हीच्या आधारे आरोपीचा माग काढला जात आहे.

सोसायटीच्या सुरक्षारक्षकामुळे अनर्थ टळला

पाठलाग झाल्यामुळे पीडित तरुणी खूपच घाबरली होती. त्यामुळे ती खूप वेगात दुचाकी चालवत सोसायटीजवळ आली. दुचाकीचा वेग जास्त असल्यामुळे स्पीड ब्रेकरवरून तिची दुचाकी घसरून ती खाली पडली. त्यावेळी आरोपीने तिच्या अंगावरील कपडे फाडून जबरदस्ती करण्यास सुरूवात केली. त्यावेळी तरूणी खूप जोरात ओरडू लागल्यामुळे सोसायटीचा सुरक्षारक्षक धावत आल्यामुळे आरोपी पळून गेला. त्यामुळे पुढील अनर्थ टळला.

आपली प्रतिक्रिया द्या