पायरीवर थुंकल्याचा जाब विचारल्यामुळे पुण्यात राडा, वाहनांची तोडफोड; दोघांना अटक

कार्यालयासमोरील पायरीवर थुंकल्याचा जाब विचारला म्हणून दोघांनी तरूणांना मारहाण केली. त्यानंतर कार्यालयाची तोडफोड करून 6 वाहनांच्या काचा फोडल्याची घटना बुधवारी दुपारी आय. बी. अ‍ॅटोमेशन इंजिनिअरींग प्रोजेक्ट प्रा.लि. विक्रांत पॅलेस माणिकबाग परिसरात घडली.

करण अर्जुन दळवी (वय – 19, रा. वडगाव), हनुमान वैजनाथ जुंझारे (वय – 21, रा. चरवड वस्ती वडगाव) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. हनुमान ज्ञानोबा मोरे (वय – 29, रा. कोंढवा) यांनी फिर्याद दिली आहे.

हनुमान मोरे काल दुपारी पाणी पिण्यासाठी त्यांच्या कार्यालयाच्या बाहेर आले होते. त्यावेळी करण त्यांच्या कार्यालयाच्या पायरीवर थुंकला. त्यामुळे मोरे यांनी त्याला कोरोना संसर्ग होण्याचा धोका समजावून सांगत थुंकल्याचा जाब विचारला. त्यावेळी करण याने त्यांना सिंहगडरोडचा भाई असून, मला ओळखत नाही का असे म्हणत शिवीगाळ केली. त्यानंतर डोक्यात दगड मारून खूनाचा प्रयत्न केला. वेळीच प्रसंगावधान दाखवत मोरे यांनी दगड चुकवून बचाव केल्याने त्यांचा जीव वाचला.

त्यानंतर आरोपीने कार्यालयाची काच फोडून मोरे यांना मारहाण करण्यास सुरूवात केली. त्यावेळी त्यांचे सहकारी अजीम शेख, मुरली सांगळे व अंबादास घुगे भांडण सोडविण्यासाठी आले असता, आरोपींनी त्यांनाही मारहाण केली. त्यानंतर दोन्ही आरोपींनी कार्यालयात घुसून संगणक, टेबल, काचा व इतर साहित्याची तोडफोड केली.

तसेच कार्यालयाबाहेरील 6 वाहनांच्या काचा फोडून नुकसान केले आहे. आरोपींच्या राड्यामुळे परिसरातील नागरिकांत भितीचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून पोलीस उपनिरीक्षक कुलदीप संकपाळ पुढील तपास करीत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या